डिसेंबर महिना सुरू होत असताना पुणेकरांना ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ या सांगीतिक मेजवानीचे वेध लागतात. महोत्सवातील कलाकारांबरोबरच आणखी एका कलाकाराची आठवण होत असते. हे कलाकार म्हणजे प्रसिद्ध प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर. अभिजात शास्त्रीय संगीताच्या आस्वादाबरोबरच संगीतप्रेमींसाठी दोन गोष्टी या महोत्सवाच्या निमित्ताने रसिकांना अनुभवता येतात. एक म्हणजे दिग्गज कलाकारांच्या भावमुद्रा-गानमुद्रांनी सजलेले छायाचित्र प्रदर्शन आणि एका सूत्रामध्ये बांधलेली (थीमबेस्ड) दिनदर्शिका. गेल्या ३४ वर्षांपासून सतीश पाकणीकर हे नाव या महोत्सवाशी जोडले गेले आहे. त्या निमित्ताने त्यांनी ‘लोकसत्ता’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
सलग ३५ वर्षे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये आपण छायाचित्रण करीत आहात. पण याची सुरुवात कशी झाली?
– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून भौतिकशास्त्र (पदार्थविज्ञान) विषयामध्ये बी. एस्सी. करत असताना ‘लेझर फिजिक्स’ या विषयामध्ये होलोग्राफी हा माझा अभ्यासाचा विषय होता. होलोग्राफी म्हणजे साध्या शब्दांत सांगायचं तर ‘थ्री डायमेन्शनल फोटोग्राफी’. पुढे एम.एस्सी. पूर्ण केल्यानंतर औद्योगिक प्रकाशचित्रण हीच वाट ‘करिअर’ म्हणून निवडण्याचे मी निश्चित केले होते. त्या आधीपासून म्हणजे अगदी शाळकरी वयापासून मी सवाई गंधर्व महोत्सव ऐकण्यासाठी जात असे. शास्त्रीय संगीतातील आपले आवडते कलाकार आपल्याला जवळून पाहायला मिळत नाहीत असे मला वाटत असे. मात्र १९८३ मध्ये जेव्हा माझ्याकडे स्वतचा कॅमेरा आला, तेव्हा मी सवाई गंधर्व महोत्सवामध्ये छायाचित्र टिपण्यास सुरुवात केली. त्या निमित्ताने अनेक दिग्गज कलाकारांना जवळून पाहायची संधीही मला मिळाली.
छायाचित्रकार म्हणून पहिल्यांदा सवाईमध्ये सहभागी झालात, तेव्हा काढलेले पहिले छायाचित्र कोणाचे होते?
– पहिले छायाचित्र कोणाचे होते हे निश्चित सांगता येणार नाही, मात्र त्या पहिल्या ‘रोल’ मध्ये स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, संगीतमरतड पं. जसराज, ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया, ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा या दिग्गज कलाकारांची छायाचित्र काढायची संधी मला मिळाली.
शास्त्रीय संगीताची ओढ असल्याशिवाय हे काम हातून होणे शक्य नाही. समोर दिग्गज कलाकार गात असताना एका बाजूला गाणे ऐकणे आणि दुसऱ्या बाजूला छायाचित्र काढणे ही किमया कशी साधता?
– पूर्वी महोत्सवामध्ये एकेक कलाकार दोन-तीन तास कला सादर करत असत. कलाकारांच्या गायनामध्ये मध्यंतरही असे. अशा वेळी थोडा वेळ ऐकणे आणि उरलेल्या वेळात छायाचित्रण करणे हा मी माझ्यापुरता शोधलेला उपाय होता. त्यामुळे मला शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेता आला आणि छायाचित्रणासाठी वेळही देता आला.
पहिले प्रदर्शन आणि पहिली दिनदर्शिका हा योग कधी जुळून आला?
– १३ ते १७ जून १९८६ या कालावधीत मी बालगंधर्व कलादालनामध्ये माझ्या ७५ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविले. माझे भाग्य हे की त्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला दस्तुरखुद्द पु. ल. देशपांडे आले. ‘या छायाचित्रांमधून प्रत्यक्ष स्वर ऐकू येतात,’ अशी दाद मला पुलंकडून मिळाली. पुढे नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट्समधील (एनसीपीए) संगीत विभागासाठी या प्रदर्शनातील छायाचित्रांच्या प्रती पुलंनी मागवून घेतल्या. माझ्यासाठी त्यांच्या या दोन्ही गोष्टी म्हणजे माझ्या कलेला मिळालेली मोठी पावती आहे, अशीच भावना झाली. १९८७ मध्ये मी पहिली दिनदर्शिका प्रकाशित केली. त्यालाही संगीतप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला. मात्र तेव्हाचे तंत्रज्ञान पाहता दिनदर्शिका काढणे मी थांबविले. नंतर २००३ पासून पुन्हा त्या कामाला सुरुवात केली आणि आता दरवर्षी महोत्सवामध्ये माझी संगीतावरील दिनदर्शिका प्रसिद्ध होते.
या ३५ वर्षांमध्ये तुम्हाला या कामाची मिळालेली संस्मरणीय पावती कोणाची?
– या कलेमुळे अनेक दिग्गज कलाकारांना ‘याचि देही याची डोळा’ पाहण्याचे भाग्य मला लाभले ही माझ्यासाठी सर्वात मोठी पावती आहे. सर्व थोर कलाकारांनी माझे कौतुक केले, प्रोत्साहन दिले. मात्र गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे एक छायाचित्र पाहून ज्येष्ठ साहित्यिक श्री. ना. पेंडसे उद्गारले, ‘वा! छायाचित्रकाराने समाधी म्हणजे काय याचे प्रत्यक्ष दर्शन या छायाचित्रातून घडविले!’ माझ्यासाठी ही सदैव स्मरणात राहणारी प्रतिक्रिया आहे!