शिरूर : विहिरीत पडलेल्या वडिलांना वाचविण्यासाठी मुलाने विहिरीत उडी मारल्यानंतर विजेचा धक्का बसल्याने पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची दुर्घटना टाकळी हाजीमधील साबळेवाडी येथे शुक्रवारी घडली. सुदाम सुभाष गाढवे (वय ४३) आणि त्यांचा मुलगा भारत (वय १७, दोघेही रा. साबळेवाडी, टाकळी हाजी, ता. शिरूर) असे मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदाम गाढवे हे विहिरीवरील मोटर सुरू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना विजेचा धक्का बसला.

बराच वेळ झाला तरी ते परत न आल्याने मुलगा भारत हा त्यांना पाहण्यासाठी विहिरीकडे गेला. वडील विहिरीत पडल्याचे पाहून त्याने विहिरीत उडी मारली. त्यालाही विजेचा धक्का बसला. पाण्यात वीजप्रवाह उतरला होता. ग्रामस्थांनी वीजप्रवाह बंद करून दोघांना विहिरीतून बाहेर काढून दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

सुदाम गाढवे हे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील नांदूर पठार येथील रहिवाशी आहेत. व्यवसायानिमित्त ते टाकळी हाजी येथे रहात होते. त्यांच्या दूध विक्रीचा व्यवसाय होता. भारत हा अकरावीत शिकत होता. याप्रकरणी ‘आकस्मिक मृत्यू’ अशी नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली.