पुणे : पिस्तुलाचा धाक दाखवून माजी सैनिकाने पिता-पुत्राला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील वडकी गावात घडली. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी माजी सैनिकाला अटक केली.

मनोज लक्ष्मण शेजवळ (वय ४४, रा. वलवा वस्ती) असे अटक करण्यात आलेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. याबाबत दत्तात्रय जयवंत फडके (वय ५५) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हडपसर-सासवड रस्त्यावरील वडकी गावातील आश्रमशाळेजवळ रविवारी ही घटना घडली.

शेजवळ याच्याकडे शस्त्र परवाना आहे. पोलिसांनी त्याच्याकडील पिस्तूल जप्त केले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजवळ हा सैन्य दलातून निवृत्त झाला आहे. फिर्यादी फडके आणि शेजवळ शेजारी आहेत. रविवारी (२५ मे) रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ते मित्राच्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी जेजुरीला गेले होते. तेथे शेजवळ आला होता. मस्करीतून त्यांच्यात वाद झाला. जागरण गोंधळ कार्यक्रम आटोपून ते वडकी गावात आले.

फडके आणि त्यांचा मुलगा प्रणिल हे घरात होते. त्या वेळी शेजवळ घरी आला. त्याने फडके यांना शिवीगाळ केली. त्यांना मारहाण केली. फडके यांनी त्याला विचारणा केली. ‘जेजुरीत तू माझा सगळ्यांसमोर अपमान केला. तू येथे बाहेरून पोट भरण्यासाठी आला आहे. तू येथे कसा राहतो हेच पाहतो. तुला आणि तुझ्या पोराला जीवे मारून टाकतो‘, अशी धमकी दिली. फडके यांनी शेजवळ याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. फडके यांचा मुलगा प्रणिल याने मारहाणीच्या घटनेचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. शेजवळने त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने दुचाकीच्या डिक्कीतून पिस्तूल काढले. फडके यांच्यावर पिस्तूल रोखले. ‘दोघांना गोळ्या घालून मारून टाकीन, आजच्या आज तुम्ही गाव सोडून जायचे’, अशी धमकी दिली. त्यानंतर घाबरलेल्या फडके यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेजवळ हा सैन्य दलातून निवृत्त झाला आहे. त्याने पिस्तुलाच्या धाकाने दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडील पिस्तूल जप्त करण्यात आले आहे, असे फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे यांनी सांगितले.