पुणे : सणासुदीच्या काळात दुग्धजन्य पदार्थांसह मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असते. याचाच फायदा घेऊन विक्रेते या पदार्थांमध्ये भेसळ करतात. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाकडून भेसळ शोधण्यासाठी धडक मोहीम सुरू आहे. या मोहिमेत गेल्या दोन महिन्यांत सुमारे दोन कोटी रुपयांचे भेसळयुक्त पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या निमित्ताने खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून नागरिकांच्या जिवाशी सुरू असलेला भेसळीचा खेळ समोर आला आहे.

सण महाराष्ट्राचा, संकल्प अन् सुरक्षिततेचा हे अभियान राज्यभरात राबविण्यात येत आहे. राज्यात सणासुदीच्या काळात सार्वजनिक आरोग्य व जनहित विचारात घेऊन हे अभियान सुरू आहे. या अंतर्गत जनतेस स्वच्छ आणि निर्भेळ अन्न प्राप्त व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाकडून ११ ऑगस्टपासून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान भेसळीच्या संशयावरून विविध खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. यात तूप, खाद्यतेल, दूध, पनीर, भगर आदी अन्नपदार्थांचा एकूण १ कोटी ९७ लाख ९३ हजार ४२ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

अन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६ नियमन २०११ अन्वये ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ३५३ खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यातील १९६ जणांना सुधारणा नोटीस पाठविण्यात आली. या मोहिमेत पुणे जिल्ह्यात विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून खवा, पनीर, स्वीट मावा, गाईचे तूप, बटर व वनस्पती आदी अन्नपदार्थांचे एकूण ६५४ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. त्यांपैकी २१६ अन्न नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, १९० प्रमाणित दर्जाचे, ५ कमी दर्जाचे, ८ वेष्टनावर चुकीचे माहिती असलेले आणि १३ अन्न नमुने असुरक्षित घोषित झाले आहेत. कमी दर्जा, वेष्टनावर चुकीची माहिती आणि असुरक्षित अन्न नमुन्याप्रकरणी कायद्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येत आहे.

सणासुदीच्या काळात विक्री करण्यात येणाऱ्या अन्नपदार्थामध्ये भेसळीबाबत काही संशय असल्यास नागरिकांनी प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ यावर संपर्क साधावा. प्रशासनाकडून भेसळखोरांवर कठोर कारवाईचे पाऊल करण्यात येत आहे.- सुरेश अन्नपुरे, सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन