पुणे : पुणे जिल्ह्यातील उद्योगांना मागील काही काळापासून अपुऱ्या पायाभूत सुविधांचे ग्रहण लागले आहे. यामुळे उद्योगपूरक पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीत वाढ व्हावी, यासाठी पिंपरी-चिंचवडमधील उद्योगांच्या शिखर संघटनेने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना साकडे घातले आहे. आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात या दिशेने पावले उचलण्याची मागणीही करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील २५ उद्योग संघटनांची शिखर संघटना फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी-चिंचवडने याबाबत अर्थमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. करोना संकटानंतर मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी फेडरेशनने अनेक मागण्या केल्या आहेत. याचबरोबर मागील काही काळापासून पिंपरी-चिंचवड परिसरातील उद्योगांना भेडसावत असलेल्या अपुऱ्या पायाभूत सुविधांचा मुद्दाही उपस्थित केला आहे. उद्योगांसाठीच्या पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीत वाढ करण्याची मागणी अर्थमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

हेही वाचा…मोसमी पाऊस दोन दिवसांत राज्यभर, पुढील दोन आठवडे पावसाचा जोर

पुणे जिल्ह्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये लॉजिस्टिक पार्कला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. याचबरोबर क्लस्टरची संख्या वाढविण्याची गरज आहे. या परिसरातील उद्योगांसाठी स्वतंत्र कार्गो विमानतळ उभारून निर्यातीला चालना द्यावी. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठीच्या योजनांची व्याप्ती वाढवावी. यामुळे हे उद्योग वाढून रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात होईल. वस्तू व सेवाकराच्या कक्षेत इंधन आणावे, असे फेडरेशनने म्हटले आहे.

हेही वाचा…पुणे: मावळच्या तळेगावात चार ठिकाणी हवेत गोळीबार; अज्ञात दुचाकीवरून फरार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे जिल्ह्यात एकात्मिक लॉजिस्टिक पार्कची निर्मिती करावी. उद्योगपूरक पायाभूत सुविधांसाठीच्या गुंतवणुकीत वाढ करावी आणि स्वतंत्र कार्गो विमानतळ सुरू करावे, अशा मागण्या आम्ही केलेल्या आहेत.– गोविंद पानसरे, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी-चिंचवड