पुणे : एका चार वर्षीय लॅब्राडोर प्रजातीच्या मादी श्वानाला मेगाइसोफॅगस या विकार होता. त्यामुळे तिला अन्न गिळण्यास त्रास होऊ लागला. ती वारंवार उलट्या करू लागली आहे आणि तिचे वजन सुमारे १० किलोने कमी झाले. अखेर डॉक्टरांनी तिच्यावर पेरोरल एंडोस्कोपिक मायोटॉमी ही प्रक्रिया केल्याने ती आता पूर्वीप्रमाणे अन्न खाऊ लागली आहे. ही जगातील अशा प्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा पुण्यातील डॉक्टरांनी केला आहे.

या श्वानाचे नाव मॅगी आहे. गेल्या चार महिन्यांपासून मॅगी दररोज ६ ते ८ वेळा उलट्या करीत होती. यामुळे तिचे जवळपास १० किलो वजन कमी झाले होते. तिला अन्न गिळण्यास त्रास होत होता. तिच्या तपासणीतून मेगाइसोफॅगस विकाराचे निदान झाले. या विकारामध्ये अन्ननलिकेचे स्नायू आकुंचन पावत नाहीत आणि अन्ननलिकेखालील परिसंकोची स्नायू योग्य कार्य करत नाहीत. यामुळे अन्न पोटात जाण्यापासून रोखले जाते. मेगाइसोफॅगस हा विकार जीवघेणा ठरु शकतो. कारण यामुळे श्वानांमध्ये कुपोषण, न्यूमोनियाही होऊ शकतो.

मेगाइसोफॅगस विकारामध्ये पूर्वी खुली शस्त्रक्रिया केली जात आहे. मात्र पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक डॉ. नरेंद्र परदेशी यांनी पेरोरल एंडोस्कोपिक मायोटॉमी प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या प्रक्रियेत कमीतकमी चिरफाड केली जात असल्याने श्वान लवकर बरा होतो आणि त्याला अन्न सहजपणे गिळता येऊ लागते. या ३ तासांच्या प्रक्रियेदरम्यान, अन्ननलिकेचे स्नायू काळजीपूर्वक कापण्यासाठी आणि अन्नाचा सामान्य मार्ग पूर्ववत करण्यासाठी एन्डोस्कोपचा वापर करण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर मॅगीला तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. तिला सुरुवातीला द्रव आहार सुरु करून एक्स-रे तपासणीद्वारे निरीक्षण करण्यात आले. एका आठवड्यात, तिच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आलीय आता ती योग्यपणे आहार घेत असल्याने तिचे कमी झालेले वजन हळूहळू वाढू लागले आहे.

मॅगी ही फक्त आमची पाळीव प्राणी नाही तर ती आमच्या कुटुंबाची एक सदस्य आहे. तिला दररोज त्रास सहन करताना पाहणे आमच्यासाठी असह्य होते. या प्रक्रियेमुळे, आम्हाला आमची खेळकर, आनंदी मॅगी पुन्हा मिळाली आहे. शुभम जाधव, मॅगीचे पालक