नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात एका किराणा माल व्यापाऱ्याच्या घरातून चोरट्यांनी ३३ तोळे सोन्याचे दागिने आणि ५१ लाख रुपयांची रोकड असा ५५ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना उघडकीस आली.याबाबत सतीश राका (वय ३१, रा. फुलगाव, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राका किराणा माल व्यापारी आहेत. मार्केट यार्ड भागात राका यांचे मामा राहायला आहेत. मामा आजारी असल्याने राका कुटुंबीय त्यांना भेटायला गेले होते.

चोरट्यांनी राका यांच्या घराचे कुलूप तोडले. कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा ५५ लाख रुपये ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरुन चोरटे पसार झाले.दरम्यान, फुलगाव परिसरातील विहिरीजवळ राका याच्या घरातील पिशवी गावातील एका नागरिकाला सापडली. पिशवीत काही कागदपत्रे आढळून आली. कागदपत्रात राका यांचे नाव असल्याने त्याने राका यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, राका उपलब्ध न झाल्याने नागरिकाने राका यांच्या नात्यातील एकाला याबाबतची माहिती दिली. नातेवाईकाने राका यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर राका फुलगावात पोहोचले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.