पुणे : मेट्रोच्या विस्तारित मार्गांची अंतिम तपासणी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सुरू आहे. ही तपासणी या आठवड्याच्या अखेरीस पूर्ण होईल. त्यानंतर लगेचच आयुक्तांकडून हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विस्तारित मेट्रो मार्गांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवर नियोजनाच्या जोरदार हालचाली सुरू आहेत, अशी माहिती महामेट्रोतील सूत्रांनी दिली.
हेही वाचा >>> पुणे : रेल्वे प्रवास आणखी सोपा…स्थानकांऐवजी आता लोकप्रिय ठिकाणांच्या नावाचा वापर
सध्या मेट्रोची सेवा दोन मार्गांवर सुरू आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे महाविद्यालय स्थानक हे एकूण १२ किलोमीटरचे दोन मार्ग ६ मार्च २०२२ रोजी प्रवाशांसाठी सुरू झाले. त्यानंतर फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय आणि गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल स्थानक या एकूण १३ किलोमीटरच्या विस्तारित मार्गांचे काम पूर्ण झाले आहे. विस्तारित मार्गांवर मेट्रोची चाचणी यशस्वीपणे घेण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान अनेक विकासकामांचे उद्घाटन केले जाणार आहे. त्यात मेट्रोचाही समावेश आहे. त्या दृष्टीने महामेट्रोचे नियोजन सुरू आहे. पुणे मेट्रोला मोदींनीच हिरवा झेंडा दाखविला होता. आता त्यांनीच विस्तारित मार्गांना हिरवा झेंडा दाखवावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा >>> पुणे : तांदळाची दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने घेतला हा मोठा निर्णय
या मार्गांची पाहणी सध्या मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त आणि त्यांच्या पथकाकडून सुरू आहे. आधी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी तीन वेळा विस्तारित मार्गांची तपासणी केली होती. या आठवड्यात ते अंतिम पाहणी करीत आहेत. त्यात मेट्रो मार्ग, सिग्नल यंत्रणा आणि स्थानकांचा समावेश आहे. त्यानंतर लवकरच आयुक्तांचा अंतिम अहवाल महामेट्रोला मिळेल. आयुक्तांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर हा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात येईल. त्यानंतर विस्तारित मार्गावरील सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल. विस्तारित सेवेचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे, असे महामेट्रोतील सूत्रांनी सांगितले.
मेट्रोचे विस्तारित मार्ग
१. गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल स्थानक
अंतर – ५.१२ किलोमीटर
स्थानके – गरवारे महाविद्यालय, डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महापालिका, जिल्हा न्यायालय, आरटीओ, पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल
२. फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय
अंतर – ८ किलोमीटर स्थानके – फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, शिवाजीनगर, जिल्हा न्यायालय
