पुणे : पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमची (जीबीएस) रुग्णसंख्या वाढल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय पथकाने मंगळवारी परिस्थितीचा आढावा घेतला. जीबीएसची रुग्णसंख्या आणि त्यांच्यावरील उपचारांची माहिती या पथकाने स्थानिक आरोग्य यंत्रणांकडून घेतली आहे. या पथकाने रुग्णसंख्या वाढण्याच्या नेमक्या कारणांचा शोध सुरू केला आहे.

जीबीएसची रुग्णसंख्या वाढल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उच्चस्तरीय पथक नेमले आहे. या पथकातील चार सदस्य पुण्यात मंगळवारी दाखल झाले. या पथकाने महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत पुण्यातील रुग्णसंख्येबाबत आढावा घेण्यात आला. रुग्णांची स्थिती आणि त्यांच्यावरील उपचार याबाबत पथकाने आढावा घेतला. केंद्रीय पथकाने आरोग्य विभागाच्या सहसंचालिका डॉ. बबिता कमलापूरकर यांच्याशीही चर्चा केली. तसेच, ससून सर्वोपचार रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसोबत बैठक घेतली.

केंद्रीय पथकाकडून जीबीएसच्या रुग्णसंख्येत नेमकी कशामुळे वाढ झाली, याचा शोध घेण्यात येत आहे. रुग्णसंख्येत वाढ होण्यास कोणते घटक कारणीभूत ठरले असतील, याच्या सर्व शक्यता पथकाकडून पडताळून पाहिल्या जात आहेत. सिंहगड रस्ता परिसरात अचानक रुग्णसंख्या वाढण्यास दूषित पाण्याच्या स्त्रोत कारणीभूत ठरल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. यामुळे केंद्रीय पथक उद्या (बुधवारी) सिंहगड रस्ता परिसरातील पाण्याचा स्त्रोतांची पाहणी करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (दिल्ली), निम्हान्स (बंगळुरू), पुण्यातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागीय कार्यालय आणि राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्था (एनआयव्ही) या संस्थांमधील सात तज्ज्ञांचा समावेश आहे. ‘एनआयव्ही’चे तीन तज्ज्ञ आधीच स्थानिक प्रशासनाला मदत करीत असून, आता केंद्रीय पथकही दाखल झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि राज्याबरोबर समन्वय साधून सक्रियपणे पावले उचलण्यात येत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जीबीएस’ निदानासाठी आता चाचण्या

जीबीएसचे पुण्यात आढळून आलेले संशयित रुग्ण आहेत. त्यांचे नेमके निदान करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंगळवारी सकाळी या प्रकरणी बैठक घेतली. या बैठकीला सर्व शासकीय यंत्रणांचे अधिकारी आणि शीघ्र प्रतिसाद पथकाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत रुग्णांच्या इलेक्ट्रोमायोग्राफी, स्पायनल टॅप आणि नर्व्ह कंडक्शन व्हेलोसिटी या चाचण्या करण्याच्या सूचना पथकाने केल्या. शहरातील रुग्णालयांना त्यांच्याकडे दाखल असलेल्या रुग्णांच्या चाचण्या करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांचा खर्च महापालिका संबंधित रुग्णालयांना देणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिली.