पिंपरी : महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आलेल्या २४ अनधिकृत होर्डिंगधारक आणि जागामालकांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. महापालिका प्रशासनाने होर्डिंगधारकांसोबत बैठक घेऊन अनधिकृत होर्डिंग काढून घेण्याची सूचना केली होती. त्यानंतरही अनेकांनी होर्डिंग काढले नाहीत. त्यामुळे महापालिकेने १५ ते २० मे २०२४ या कालावधीत अनधिकृत होर्डिंगचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये २४ होर्डिंग अनधिकृत आढळून आले. त्यांपैकी २० हटविण्यात आले आहेत. त्यामध्ये ९ होर्डिंग महापालिकेच्या वतीने पाडण्यात आले. तर, ११ अनधिकृत होर्डिंग स्वत: होर्डिंग धारकांच्या वतीने हटविण्यात आले आहेत.

सर्वेक्षणामध्ये आढळून आलेल्या सर्व होर्डिंग धारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनधिकृत होर्डिंग पाडण्याची कारवाई सुरू आहे. महापालिकेच्या वतीने होर्डिंगधारकांसाठी स्थापत्यविषयक लेखापरीक्षणासाठी नवीन प्रणाली लागू करण्यात येणार आहे. होर्डिंगचे नियमित सर्वेक्षण आणि अनधिकृत होर्डिंगवरील कारवाई पुढेही सुरूच राहणार आहे. याबाबतच्या सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

हेही वाचा >>> Pune Accident : अजित पवार गटाचे आमदार आरोपीच्या अटकेनंतर मध्यरात्री पोलीस ठाण्यात का गेले? ठाकरे गटाचा सवाल

अनधिकृत होर्डिंग पाडणे, जाहिरातधारक, तसेच जागामालकांवर गुन्हा दाखल करणे हे शहरातील नागरी सुव्यवस्था आणि सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याचेही त्यांनी सांगितले.

सूचनांचे पालन न केल्यास कारवाई

जागामालक, जाहिरातधारकांनी कोणत्याही खासगी जागेमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी लोखंडी सांगाड्यावर जाहिरात फलक बसविताना हलगर्जीपणामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी होणार नाही, याची काळजी घ्यावी. जाहिरातधारकाने फलक बसविताना होर्डिंगधारकाने पालिकेची परवानगी घेतलेली आहे की नाही याची खातरजमा करावी.

हेही वाचा >>> “साप-साप म्हणून भुई थोपटू नका”, पुणे अपघातावरून प्रशासनावर आरोप करणाऱ्या काँग्रेसला मुरलीधर मोहोळांचा टोला

परवानगी घेतली नसल्यास किंवा नियमांचे उल्लंघन केलेले आढळल्यास संबंधित जाहिरातधारक, जागामालक, तसेच फलकधारकावर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

२४ अनधिकृत होर्डिंगसोबत वाढीव ३४१ जाहिरातफलकही सर्वेक्षणात आढळून आले आहेत. या जाहिरात फलकधारकांना फलकाचे आकारमान सुधारण्याबाबत नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. फलकाचे आकारमान नियमानुसार बदलले नाही, तर फलक हटविण्याची कार्यवाही केली जाणार आहे. – संदीप खोत, उपायुक्त, आकाश चिन्ह व परवाना विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका