पुणे स्टेशन परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर असणारी दुकाने आणि होर्डिंग्जला आग लागल्याची घटना घडली आहे. गॅसची गळती झाल्याने ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवलं. पण यावेळी सर्व दुकानं जळून खाक झाली होती.

अग्निशमन विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयतीच्या निमित्ताने पुणे स्टेशन येथील पुतळ्याच्या समोरील बाजूला काही स्टॉल लावण्यात आले आहेत. काही खाद्यपदार्थ तयार करण्याचं काम तीन वाजण्याच्या सुमारास सुरू होते. यावेळी गॅस गळती झाल्याने आग लागली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आलं. पण तोवर काही स्टॉल आणि बाजूचे होर्डिंग जळून खाक झाले. या घटनेत कोणीही जखमी नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.