पुणे : प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता खराब होत असल्याबाबत मुंबईत दिवाळीत फटाके उडवण्यावर न्यायालयाने निर्बंध घातले आहेत. गेल्या काही दिवसांत पुण्यातही हवेची गुणवत्ता बिघडल्याचे निदर्शनास आले आहे. असे असतानाही, रविवारी पहाटेपासून सुरू झालेली फटाक्यांची आतषबाजी दिवसभर सुरूच होती. सायंकाळी लक्ष्मीपूजनानंतर तर मोठ्या प्रमाणात फटाके उडवण्यात आल्याचे दिसून आले.

पावसाळा संपून थंडीची चाहूल लागताच हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसामुळे जमिनीवर राहणारे धुलिकण हवेत जाऊन हवा प्रदूषित होते. वाहनांचा धूर, बांधकामे, फटाके यामुळे त्यात भर पडते. गेल्या काही दिवसांत मुंबईप्रमाणेच पुण्यातील हवेची गुणवत्ता बिघडल्याचे हवा गुणवत्ता निर्देशांकातील आकडेवारीतून दिसून आले होते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात आले. त्याशिवाय वायू प्रदूषण रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेकडून मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध करण्यात आल्या.

हेही वाचा >>>लक्ष्मीपूजनाच्या आतषबाजीमुळे १५ ठिकाणी आगीच्या घटना; अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ

दिवाळीचा सण ९ नोव्हेंबरपासून सुरू झाल्यावर फटाके उडवण्यास सुरुवात झाली. रविवारी नरक चतुर्दशी असल्याने पहाटेपासूनच फटाके उडवण्यास सुरुवात झाली. दिवसभर शहरात ठिकठिकाणी फटाके उडवणे सुरूच होते. तर सायंकाळी लक्ष्मी पूजनानंतर मोठ्या प्रमाणात फटाके उडवण्यात आले. त्यात बॉम्ब, माळांसारख्या आवाजी फटाक्यांसह आकाशात फुटणाऱ्या रोषणाईच्या फटाक्यांचाही समावेश होता. त्यामुळे प्रदूषण कमी करणे, हवेची गुणवत्ता राखण्याचे दुर्लक्षच झाल्याचे दिसून आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर

पुणे शहर आणि परिसरातील काही भागांमध्ये रविवारी हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर गेल्याचे दिसून आले. त्यात प्रामुख्याने पिंपरी चिंचवड, भोसरी, आळंदी, कात्रज अशा काही भागांमधील हवेची गुणवत्ता बिघडली होती. हवेची गुणवत्ता बिघडल्याने श्वसनास त्रास होणे, दम लागणे अशा आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.