कल्याणीनगर मधील डी-मार्ट मॉलच्या पार्किंगमध्ये माथाडी कामगार संघटनेचे नेते अन्वर मेहमूद पठाण (वय ३७, रा. निसर्ग सोसायटी, येरवडा) यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्याची घटना मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. यामध्ये एक गोळी त्यांच्या डाव्या दंडात घुसली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले आहेत. हा हल्ला माथाडी कामगार संघटनेच्या वर्चस्वातून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर येथील डी-मार्ट मॉलच्या इमारतीमध्ये असलेल्या जीममध्ये पठाण हे दररोज व्यायामासाठी जातात. सकाळी नऊ ते अकरा दरम्यान या ठिकाणी व्यायाम करतात. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांचे मित्र व व्यवसायातील भागीदार अभिजित वाघचौरे यांच्यासोबत या ठिकाणी ते व्यायामाला गेले होते. मोटार पार्कीगमध्ये लावून जीमकडे जात असताना पार्कीगमध्ये दबा धरून बसलेल्या व्यक्तींने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यातील पहिला गोळी त्यांना लागली नाही. दुसरी गोळी त्यांच्या दंडातून आरपार झाली. आचानक गोळीबार झाल्यामुले पठाण घाबरून पळू लागले आणि जीमजवळ ओरडत गेले. त्या ठिकाणी एक महिला कर्मचारी व त्यांचे मित्र वाघचौरे त्या ठिकाणी आले. त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. हल्लेखोर हे दुचाकीवरून पळून गेले. पठाण यांना तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. गोळीबार झाला त्यावेळी पार्कीगमध्ये जास्त वर्दळ नव्हती. गोळीबाराचा आवाज आल्यानंतर सुरक्षारक्षकांनी तिकडे धाव घेतली. त्या वेळी एक हल्लेखोर बाहेर दुचाकी घेऊन उभा होता. त्यावर बसून दोघेही पळून गेले. घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पठाण हे माथाडी कामगार सेनेचे कार्यकर्ते आहे. स्टार एंटरप्रायजेस नावाची त्यांची कंपनी असून यामार्फत ते सफाई कामाचा ठेकाही  घेतात. वाघचौरे यांच्यात भागीदारीत ते व्यवसाय करतात.
याबाबत पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे यांनी सांगितले की, हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधलेला होता. गोळीबार केल्यानंतर दुचाकीवरून त्यांनी पळ काढला. घटनास्थळावरून रक्ताचे नमुने घेण्यात आले असून पोलिसांना दोन पुंगळ्या मिळाल्या आहेत. तपासाच्या दृष्टीने सीसीटीव्ही फूटेज घेण्याचे काम सुरू आहे. जखमी पठाण हे घाबरलेल्या स्थितीत असल्यामुळे बोलण्याच्या मन:स्थितीत नाहीत. पोलिसांचा योग्य दिशेने तपास सुरू आहे.