पुणे : उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांना हटकल्याने रखवालदारावर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊर परिसरात घडली. सुदैवाने या घटनेत रखवालदार जखमी झाला नाही. मोटारीतून पसार झालेल्या आरोपींनी दगड फेकून मारल्याने रखवालदाराची पत्नी जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले. आरोपीने पिस्तूल बेकायदा बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी भानूदास शेलार, अजय मुंढे, सतीश उर्फ नाना मुंढे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. रखवालदार अक्षय साहेबराव चव्हाण याने याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी केलेल्या दगडफेकीत रखवालदार चव्हाण याची पत्नी शीतल जखमी झाली.

हेही वाचा >>> भंगार दुकानातील कॉम्प्रेसरच्या स्फोटात कामगाराचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊर परिसरात जय मल्हार हाॅटेलजवळ मोकळ्या जागेत अक्षय हा रखवालदार आहे. अक्षय आणि त्याची पत्नी शीतल तेथे राहायला आहेत. शुक्रवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास मोटारीतून आरोपी आले. ते मोकळ्या जागेत लघुशंका करत होते. रखवालदार चव्हाणने त्यांना हटकले. त्यानंतर आरोपींनी त्याला शिवीगाळ केली. चव्हाणला मारहाण करुन त्याला दगड फेकून मारला. चव्हाणची पत्नी शीतलने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी फेकून मारलेला दगड तिला लागल्याने तिचे डोके आणि पायाला दुखापत झाली. आरोपींनी चव्हाण याच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडली. दैव बलवत्तर होते म्हणून तो बचावला. चव्हाणने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक करणकोट यांनी दिली.