पुणे : वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेला (वॅन्मिकाॅम) गुजरात येथील त्रिभुवन सहकार विद्यापीठाचे संलग्नत्व मिळाले आहे. विद्यापीठाची मान्यता मिळविणारी ही देशातील पहिली सहकार संस्था ठरली असून, या संस्थेतील चार विविध प्रकारचे अभ्यासक्रम त्रिभुवन विद्यापीठाअंतर्गत चालविले जाणार आहेत.

देशातील पहिले सहकार विद्यापीठ गुजरातमध्ये स्थापन करण्यात आले आहे. या विद्यापीठाला ‘त्रिभुवन सहकार विद्यापीठ’ असे नाव देण्यात आले आहे. सहकार विद्यापीठाचे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. या विद्यापीठामुळे पुण्यातील वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थेचे महत्त्व कमी होणार असल्याची टीका सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली होती. मात्र, या विद्यापीठात ही संस्था अविभाज्य घटक असेल, असे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार ही संस्था त्रिभुवन विद्यापीठाशी संलग्न करण्यात आली आहे. त्याबाबतची माहिती मोहोळ यांनी दिली.

चार दीर्घकालीन पदवी आणि सहा अल्पकालीन कौशल्यवर्धित या पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबर आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा सहकारातील वापरासंबंधीचे अभ्यासक्रम या संस्थेत शिकविले जाणार असल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते म्हणाले, ‘वैकुंठभाई मेहता संस्थेच्या वतीने सध्या कृषी व्यवसाय व्यवस्थानाचा दोन वर्षांचा पदव्युत्तर-पदविका, सहकार विषयातील दोन वर्षांचा पदव्युत्तर-पदविका, सहकारी बँकिंग आणि वित्त विषयातील चार वर्षांचा व्यवसाय प्रशासन पदवी आणि सहकार व्यवसाय व्यवस्थापनाचा नऊ महिन्यांचा पदविका अभ्यासक्रम सुरू आहे. त्रिभुवन सहकार विद्यापीठाची या संस्थेला देशातील पहिली मान्यता मिळाल्याने सहकारविषयक पूर्ण शैक्षणिक काम या संस्थेला करता येईल. तसेच, येथे शिकणाऱ्या सर्वांना अधिकृत विद्यापीठाची पदवी, पदविका किंवा प्रमाणपत्र मिळणार आहे. या संस्थेत सहकारविषयक संशोधनालाही चालना मिळणार असल्याने ग्रामीण भागातील युवकांसाठी नवे दालन खुले होणार आहे.’

देशातील सहकारापासून समृद्धीकडे नेण्यासाठी हे टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. त्यातून सहकार क्षेत्रातील अभ्यासक्रमांसाठी एक मजबूत राष्ट्रीय शैक्षणिक व्यासपीठ तयार होईल. – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार राज्यमंत्री.