पिंपरी : ‘मावळ तालुक्यातील इंदोरीतील कुंडमळा येथील लोखंडी पूल कोसळल्याच्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. घटना घडलेल्या दिवशी पोलीस होते की नाही, कोणाची चूक आहे, या सर्व बाबींची चौकशी होईल. चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मावळ तालुक्यासाठी आपत्तीविषयक एक वाहन उपलब्ध करून दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पवार यांनी मंगळवारी कुंडमळा दुर्घटनेतील जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यानंतर कुंडमळा येथे पाहणी केली. त्या वेळी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील या वेळी उपस्थित होते.

‘या घटनेच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. त्यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी, वन विभागाचे उपवनसंरक्षक, जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांचा समावेश आहे. सर्व बाबी चौकशीत पुढे येतील. लवकर चौकशी पूर्ण करून अहवाल देण्याचे समितीला सांगितले आहे. अहवाल आल्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल,’ असे पवार यांनी नमूद केले.

ते म्हणाले, ‘ही समिती जिल्ह्यातील अतिधोकादायक पर्यटनस्थळे आणि फिरण्यासाठी जाण्याच्या योग्यतेची पर्यटनस्थळे जाहीर करील. अतिधोकादायक ठिकाणी पर्यटकांना जाण्यास मनाई केली जाईल. स्थानिक, आदिवासी समुदायाचे लोक पाण्यात उड्या मारून लोकांना वाचविण्याचे काम करतात. असे काम करणाऱ्या लोकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यांची आपत्ती व्यवस्थापन पथकात नोंद करून घेतली जाईल.‘ही दुर्घटना घडल्यानंतर जखमींना उपचारांसाठी दाखल करण्यास प्राथमिकता दिली. घटनेतील काही जखमींना सात दिवसांनंतर दिल्ली येथे पुढील उपचारांसाठी जावे लागणार आहे. त्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याबाबत सूचना दिल्या आहेत. प्रांताधिकाऱ्यांकडे याबाबतची जबाबदारी सोपवली आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

पूल पूर्णपणे काढणार

‘पुलावर गर्दी जास्त झाल्यामुळे पूल कोसळला. हा पूल पूर्णपणे काढून टाकला जाणार आहे. जिल्ह्यातील आयुर्मान संपलेले पूलही पाडले जातील. कारण, धोक्याच्या सूचना लावल्या, तरी पर्यटक ऐकत नाहीत,’ असे अजित पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘नवीन पूल ११ महिन्यांत बांधणार’

कुंडमळा येथे साडेसात मीटर रुंदीचा नवीन पूल मंजूर आहे. त्याचा कार्यारंभ आदेश दिला आहे. पावसाळ्यात काम करण्यास अडचणी येतात. काम लवकर करण्याच्या सूचना केल्या आहेत. ठेकेदाराने ११ महिन्यांत काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे. नवीन पुलावरून वाहने ये-जा करतील. येथे येणाऱ्या नागरिकांसाठी पुलाच्या दोन्ही बाजूंनी आठ-आठ फुटांचे दोन पदपथ तयार केले जाणार आहेत. या पुलावर दर्शक गॅलरी उभारण्यात येईल. त्यासाठी अधिकचे चार कोटी रुपये खर्च येणार आहे. हे पैसे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) दिले जाणार आहेत,’ असेही अजित पवार यांनी सांगितले.