पुणे : शहरातील वाढत्या सायबर गुन्ह्यांची संख्या विचारात घेऊन आणखी पाच नवीन सायबर पोलीस ठाण्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात आला आहे. नवीन सायबर पोलीस ठाण्यांसाठी पायाभूत सुविधांसह अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
‘शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात सध्या सायबर पोलीस ठाणे आहे. सायबर पोलीस ठाण्यात दररोज किमान १०० ते १५० तक्रारअर्ज दाखल होतात. शहरातील वाढते सायबर गुन्हे, फसवणुकीचे प्रमाण विचारात घेता शहरात आणखी पाच नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्याची गरज आहे. त्यासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी आणि पायाभूत सुविधा लागणार आहेत. याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे’, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नमूद केले.
शहरात सात नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. नवीन पोलीस ठाण्यांचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण पोलीस दलातील लोणीकंद, लोणी काळभोर पोलीस ठाण्यांचा समावेश पुणे पोलीस दलात करण्यात आला आहे. शहराचा वाढता विस्तार, तसेच नवीन पोलीस ठाण्यांचा समावेश विचारात घेता आणखी १ हजार ६०० पाेलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावेत, असा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यांपैकी ८०० पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पुणे पोलीस दलात आणखी एक हजार पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावेत, असा प्रस्ताव नव्याने पाठविण्यात आला आहे.
पुणे पोलीस दलात सहावे परिमंडळ
पुणे पोलीस दलात सध्या पाच परिमंडळे आहेत. शहराचा विस्तार विचारात घेता आणखी एक परिमंडळाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पोलीस ठाण्यांची रचना विचारात घेेऊन परिमंडळ सहाची निर्मिती करण्यात येणार आहे. याबाबत गृह विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.