पिंपरी : एका बहुराष्ट्रीय (मल्टीनॅशनल) कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून पाच जणांची ११ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ८ ऑगस्ट २०२४ ते १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत बावधन परिसरात घटना घडली.याप्रकरणी २९ वर्षीय तरुणाने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एका कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी तर दुसरा आरोपी एका कंपनीचा सल्लागार आहे. या दोघांनी संगनमत करून फिर्यादी यांना कंपनी बहुराष्ट्रीय असल्याचे भासवून विश्वास संपादन केला. नोकरी देण्याच्या बदल्यात फिर्यादीकडून एक लाख रुपये आरोपीच्या खात्यामध्ये जमा करून घेतले. तसेच, फिर्यादीकडून कंपनीत दोन महिने काम करून घेतले, परंतु त्यांना त्याचा ५० हजार रुपये पगार दिला नाही. याप्रमाणे फिर्यादीची एकूण एक लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. त्यासह आणखी तिघांची अशी एकूण नऊ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. बावधन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
शेतीत काम करणाऱ्या महिलेस मारहाण
शेतात काम करणाऱ्या एका महिलेस मारहाण करून तिचा विनयभंग केला. तसेच जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिली. ही घटना खेड तालुक्यात घडली.याप्रकरणी एका महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तेजस राजाराम लोखंडे (३०) आणि प्रसाद हनुमंत लोखंडे (२८) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या शेतात काम करत असताना आरोपी तेजस तिथे आला. त्याने फिर्यादीस जातीवाचक बोलून धमकी दिली. त्यानंतर आरोपी प्रसाद याने महिलेसोबत गैरवर्तन करून विनयभंग केला. आरोपींनी फिर्यादीच्या उजव्या पायावर लाकडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी फिर्यादीचे पती आणि त्यांची मुलगी सोडवण्यासाठी आले असता, त्यांनाही लाकडी दांडक्याने हाता-पायावर मारहाण करून पतीचा डावा हात फॅक्चर केला. आरोपी तेजस याने फिर्यादी आणि त्यांच्या पतीला दगड फेकून मारले. फिर्यादीची लहान मुलगी भांडण सोडवण्यासाठी आली असता आरोपी तेजसने तिचा गळा पकडून तिचे टी-शर्ट फाडून तिला जमिनीवर ढकलले. आळंदी पोलीस तपास करत आहेत.
भांडणाचा जाब विचारणाऱ्या महिलेला दुचाकीने फरफटत नेले पतीसोबत झालेल्या किरकोळ वादाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका महिलेला दुचाकीने फरफटत नेले. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. ही घटना जांभे येथील शाळेच्या समोर घडली. याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या पतीचा आरोपीसोबत किरकोळ वाद झाला होता. याचा जाब फिर्यादीने आरोपीला विचारला असता, त्याने त्याची दुचाकी चालवून, तिच्या हॅन्डलला फिर्यादीचा पदर धरून त्यांना फरफटत नेले. यामुळे फिर्यादीच्या पायाला, कमरेला, हाताला आणि डोक्याला खरचटून त्या जखमी झाल्या. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी येथील गांधीनगर परिसरात कदम चाळीच्या पाठीमागे मोकळ्या जागेत पैशांवर तीन पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या सात जणांवर संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळी करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस शिपाई सुनील धावारे यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एकत्र जमून तीन पत्त्याचा जुगार पैशांवर खेळताना आढळले. त्यांच्याकडून एकूण ३७ हजार ४८० रुपये रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.