पुणे: सध्या तापमानात मोठे चढउतार सुरू असून, अवकाळी पावसाचे वातावरण आहे. या वातावरणामुळे श्वसनविकाराच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे. दम्यासह इतर तक्रारींमध्ये वाढ झाली असून, आरोग्यतज्ज्ञांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
‘मे महिन्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे ढगाळ वातावरणाबरोबर उष्णताही आहे. अशा वातावरणामुळे दम्याच्या रुग्णांचा दमा उसळू शकतो. काही रुग्णांमध्ये औषधे नियमित न घेतल्यास हा त्रास अधिक वाढतो. श्वसनविकाराच्या रुग्णांनाही अशा वातावरणामुळे त्रास उद्भवतो. या रुग्णांनी वेळच्या वेळी औषधे घेण्याबरोबर आरोग्याची काळजी घ्यावी.
ताप, खोकला, सर्दी आणि श्वसनास त्रास अशी लक्षणे दिसून येत आहेत. विशेषत: श्वसनविकार असलेल्या ज्येष्ठांना त्रास होण्याचे प्रमाण जास्त आहे. सहव्याधीग्रस्त ज्येष्ठांनी या काळात विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यांनी किरकोळ त्रासाकडे दुर्लक्ष न करता वेळीच औषधोपचार घेण्याची गरज आहे,’ अशी माहिती ससून सर्वोपचार रुग्णालयातील श्वसनविकार विभागाचे प्रमुख डॉ. संजय गायकवाड यांनी दिली.
‘ढगाळ वातावरणात श्वसनविकाराच्या रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी. त्यांनी पावसात भिजू नये आणि शक्यतो बाहेर पडणे टाळावे. श्वसनविकाराच्या रुग्णांनी प्रामुख्याने औषधे नियमितपणे घ्यावीत. या रुग्णांनी खाण्याची पथ्येही पाळावीत. आधीपासून त्रास असलेल्या रुग्णांना डॉक्टरांकडून याबाबत सूचना केलेल्या असतात. रुग्णांनी या सूचनांचे पालन करावे. पहिल्यांदाच त्रास होत असलेल्या रुग्णांनी जास्त तिखट, मसालेदार पदार्थ खाऊ नये. कारण त्यामुळे पित्त होते. काही रुग्णांमध्ये झोपल्यानंतर पोटातील पित्त छातीत येऊन त्रास होतो,’ असे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.
त्रास नेमका काय?
– वारंवार धाप लागणे
– श्वास घेण्यास त्रास
– थकवा जाणवणे
– सतत खोकला
– ताप, सर्दी
– छातीत घरघर
काळजी काय घ्यावी?
– धूळ, हवा प्रदूषणापासून दूर राहावे.- पावसात भिजू नये.
– तिखट, मसालेदार पदार्थ टाळावेत.
– औषधे नेहमी सोबत ठेवावीत.
– धूम्रपान टाळावे.
– त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा