पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे कमाल तापमानासोबत किमान तापमानातही घट झाली आहे. हवामानातील हे बदल प्रकृतीच्या तक्रारी वाढविणारे ठरले आहेत. यामुळे हृदयविकारासह श्वसनविकाराचे त्रास वाढले असून, काळजी घेण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.

शहरातील कमाल तापमान मे महिन्याच्या सुरुवातीला ४० अंश सेल्सिअसवर तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअसवर होते. अवकाळी पाऊस सुरू झाल्यानंतर तापमानात अचानक घट होऊन कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसवर तर किमान तापमान २० अंश सेल्सिअसवर घसरले आणि पुन्हा २२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. तापमानात अचानक झालेले हे चढउतार आरोग्याच्या तक्रारी वाढविणारे ठरत आहेत. यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.

हेही वाचा >>>पिंपरी : इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली!

तापमानात अचानक झालेला बदल हा हृदयक्रियेवरील ताण वाढविण्यासोबत फुफ्फुस, प्रतिकारशक्ती यावरही परिणाम करतो. यामुळे अस्थमा, श्वसनविकार, संधिवात अशा तक्रारी वाढतात. सध्याच्या बदललेल्या हवामानामुळे श्वसनविकाराचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अस्थमा आणि ॲलर्जीचा त्रास असलेल्या नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. हवेतील आर्द्रतेत झालेला बदल आणि धूलिकण यामुळे अस्थमाचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे अशा नागरिकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच उपचार करावेत. प्रतिकारशक्ती कमी झाल्याने सर्दी, तापाचे रुग्ण वाढू लागले आहेत, असे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले.

हेही वाचा >>>पुण्यात वाढलेला मतटक्का कोणत्या ‘लाटे’चा परिणाम? ‘कसब्या’त सर्वाधिक, तर ‘शिवाजीनगर’मध्ये सर्वांत कमी मतदान

कोणत्या तक्रारी वाढल्या…

– श्वसनविकाराचे प्रमाण जास्त

– प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याने इतर आजारांचा धोका

– सर्दी, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ

– हृदयविकार असलेल्या रुग्णांना त्रास

– अस्थमा रुग्णांच्या तक्रारींमध्ये वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वसाधारणपणे उन्हाळ्यात रक्तदाब कमी असतो. उष्णतेमुळे शरारीतील पाण्याची पातळी कमी होते आणि त्वचेतील रक्तवाहिन्यांचा विस्तार होऊन रक्तदाब कमी होतो. मात्र, तापमानातील बदलामुळे रक्तदाबात वाढ होण्याची शक्यता असते. यामुळे उच्च रक्तदाबासाठी औषधे घेणाऱ्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. – डॉ. सुशील कुमार मलानी, हृदयविकारतज्ज्ञ, डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल