पुणे: ऐन गणेशोत्सवात पुण्यात टोळी युद्धाचा भडका उडाला आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी या खून प्रकरणातील आरोपी गणेश कुमकरचा मुलगा गोविंद कोमकर याचा शुक्रवारी संध्याकाळी नाना पेठ येथे गोळ्या घालून खून करण्यात आला. नाना पेठेतील हमाल तालीमजवळ एका इमारतीच्या पार्किंगमध्ये गाेविंद याच्यावर पिस्तुलातून चार गोळ्या झाडण्यात आला. त्यात तो मृत्युमुखी पडला.

 वर्चस्ववादातून गेल्यावर्षी एक सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणात सोमनाथ गायकवाड, अनिरुद्ध दूधभाते, वनराज आंदकर यांची बहीण संजीवनी कोमकर, जयंत कोमकर आणि गणेश कोमकर यांच्यासह १६ आरोपींना अटक करण्यात आली होती.

आंदेकर टोळीने वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्याचा कट रचल्याचे नुकत्याच उघडकीस आले. धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरात सोमनाथ गायकवाड आणि अनिरुद्ध दूधभाते रहायला आहेत. आंदेकर टोळीने गायकवाड आणि दूधभाते यांच्या निकटवर्तीयांवर पाळत ठेवली होती. भारती विद्यापीठ पोलीस आणि गुन्हे शाखेने कारवाई करून एकाला अटक केली होती. याप्रकरणी कृष्णा आंदेकर यांच्यासह आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. ऐन गणेशोत्सवात शहरात टोळीयुद्धाचा भडका उडाल्याने घबराट उडाली आहे.