पुणे : ‘भाषेच्या माध्यमातून माणूस विचार, कल्पना, अनुभवातून साहित्य निर्मिती करू शकतो. अनुभवाला कल्पनेची जोड दिल्यास उत्तम कथा निर्माण होते. आपल्या जगण्याशी, अनुभवांशी साधर्म्य सांगणाऱ्या कथा वाचकाला भावतात. आधुनिक तंत्रज्ञानामुळे कुटुंबव्यवस्थेवर परिणाम होत असताना सामाजिक विचारमंथन होण्यासाठी साहित्याचा आधारच उपयुक्त ठरतो,’ असे मत राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डाॅ. सदानंद मोरे यांनी रविवारी व्यक्त केले.
करम प्रतिष्ठानाच्या दहावा वर्धापनदिन कार्यक्रमात डाॅ. सदानंद मोरे यांच्या हस्ते स्मिता जोशी-जोहरे यांच्या ‘तरंग’ या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. त्या प्रसंगी मोरे बोलत होते. करम प्रतिष्ठानाचे अध्यक्ष भूषण कटककर, प्रज्ञा महाजन, डॉ. बाबूल पठाण, प्रमोद आडकर, ज्योत्स्ना चांदगुडे, धनंजय तडवळकर, स्वाती सामक या वेळी उपस्थित होत्या.
मोरे म्हणाले, ‘कथा हा साहित्य प्रकार माणसाला जगायला, सक्षम व्हायला उपयुक्त ठरतो. तरंग संग्रहातील कथांतून विवाह संस्था, स्त्रीची रूपे, वृद्धत्वाचे प्रश्न, कुटुंब व्यवस्था यावर भाष्य होत प्रस्थापित संकल्पना बदलण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. झपाट्याने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञान आणि विज्ञानामुळे मानवाला सतत बदलांना सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे आज कुटुंब व्यवस्था धोक्यात आली आहे. अशा वेळी साहित्यकृतींचा सामाजिक मंथन होण्यासाठी नक्कीच उपयोग होतो.’ उत्तरार्धात झालेल्या गज़ल संमेलनात निरुपमा महाजन, प्राजक्ता वेदपाठक, मुक्ता भुजबले, वैजयंती आपटे, वासंती वैद्य यांनी सहभाग घेतला.