पिंपरी: महाविकास आघाडीच्या नावाखाली पुणे जिल्ह्यातून शिवसेनेला संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. सरकारला विरोध नाही. मात्र, गावागावांत शिवसैनिकांवर अन्याय होतो आहे. प्रत्येक गोष्ट मुख्यमंत्र्यांना सांगता येत नाही, अशी व्यथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी पक्षाच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केली. उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडेच आढळराव यांचा रोख होता. तथापि, त्यांनी पवारांचा थेट नामोल्लेख केला नाही.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या उपस्थितीत चाकणला झाला. यावेळी बोलताना आढळराव यांनी सध्याच्या शिवसेनेतील घडामोडींवर भाष्य करतानाच पक्षनेतृत्वाकडून स्थानिक पातळीवर वेळोवेळी होत आलेले दुर्लक्ष आणि त्याचा गैरफायदा घेऊन राष्ट्रवादीने शिवसेनेच्या विरोधात चालवलेले कुरघोडीचे राजकारण, याचा सविस्तर पाढाच संपर्कप्रमुखांसमोर वाचला.

आढळराव म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून शिवसेनेला पुणे जिल्ह्यात सर्वाधिक फटका बसला असून खेड मतदारसंघाला जास्तच भोगावे लागले. या तालुक्यातील शिवसेनेच्या ऱ्हासाचे कारण राष्ट्रवादी काँग्रेस हेच आहे. खेड पंचायत समितीची प्रशासकीय इमारत बांधण्याचे काम शिवसेनेच्या आमदाराने मंजूर करून आणले. मात्र, शिवसेनेला श्रेय मिळणार म्हणून राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांनी कितीतरी खटाटोप केला. सव्वा वर्षापूर्वी खेड तालुक्यात झालेल्या बंडखोरीचा मोठा फटका शिवसेनेला बसला होता. तेव्हा त्या गद्दारीचा निषेध करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. पक्षातून साधी दखलही कोणी घेतली नाही. पक्षातील घाणेरड्या राजकारणाचा अनुभव आला. कितीही बाका प्रसंग आला तरी, शिवसेनेने एकजूट कायम ठेवली पाहिजे. बोटचेपे धोरण ठेवता कामा नये. अडचणीच्या काळात जर पक्षच पाठीशी उभा राहणार नसेल, तर कशासाठी लोक शिवसेनेत येतील? राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते राज्यसभा तसेच विधान परिषद निवडणुकीवेळी मतदानासाठी टाळाटाळ करत होते. मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याची विधाने जाहीरपणे करत होते, याकडे आढळराव यांनी लक्ष वेधले.

पालकमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच दीडशे ते दोनशे कामांचे शासन निर्णय (जीआर) काढले. इतकेच नव्हे तर, पुणे जिल्हा नियोजन समितीचा १७८ कोटींचा निधी त्यांच्या निकटवर्तीयांना एकतर्फी वाटण्यात आला. पुणे जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला फायदेशीर ठरतील, अशाच पध्दतीने प्रभागरचना झाल्या आहेत. याविषयी काहीही सांगण्याचा प्रयत्न केला, तरी ऐकून घेतले जात नाही. हे चाललयं काय, राष्ट्रवादीला आम्ही आणखी किती सहन करायचे आहे. याबाबतच्या सर्व गोष्टींचा विचार झाला पाहिजे, अशी अपेक्षा आढळराव यांनी संपर्कप्रमुखांकडे व्यक्त केली.

‘बंड झाल्यानंतर शिवसेना होते अधिक बळकट’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेच्या इतिहासात कधी नव्हे ती विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. बंडखोरी आणि गद्दारी शिवसेनेला नवीन नाही. अनेक संकटांचा सामना करत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची वाटचाल सुरू ठेवली. जेव्हा-जेव्हा बंड झाले, त्यानंतर शिवसेना अधिक भक्कम होते, हा इतिहास आहे. शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे. जागोजागी, गावोगावी निदर्शने होत आहेत. पक्षावर आलेले संकट लवकरच दूर होईल. शिरूर मतदारसंघातील शिवसेना पूर्णपणे उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी आहे, असे शिवाजीराव आढळराव यांनी यावेळी स्पष्ट केले.