लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: येरवड्यातील बालसुधारगृहातील भिंतीला शिडी लावून चार मुले पसार झाल्याची घटना उघडकीस आली. बालसुधारगृहातून तीन महिन्यांपूर्वी गंभीर गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेली चार अल्पवयीन मुले पसार होण्याची घटना घडली होती.
याबाबत येरवड्यातील पं. जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रातील कर्मचारी सुमंत जाधव (वय ३१) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नऊ अल्पवयीन मुलांच्या विरुद्ध धमकावणे, गोंधळ घालणे तसेच कायदेशीर रखवालीतून पसार झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवड्यात पं. जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्राचे बालनिरीक्षण गृह आहे. बालसुधारगृहात गंभीर गुन्ह्यात सामील असलेल्या अल्पवयीन मुलांना बालन्याय मंडळाच्या आदेशाने ठेवण्यात येते.
आणखी वाचा- पुणे : मालमत्ता करातील सवलत पुन्हा होणार सुरू, वसुलीही माफ; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलांच्या दोन गटात किरकोळ कारणावरुन वाद झाले होते. नऊ अल्पवयीन मुलांनी दोन मुलांना मारहाण केली. अल्पवयीन मुलांच्या वादावादीमुळे बालसुधारगृहाच्या आवारात गोंधळ उडाला. गोंधळाचा फायदा घेऊन चार अल्पवयीन मुलांनी आवरात पडलेली शिडी उचलली. बालसुधारगृहातील भिंतीला शिडी लावून चार अल्पवयीन मुले पसार झाली. पसार झालेल्या अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील तपास करत आहेत.