पिंपरी : बँकेत नोकरी लावतो असे सांगून एकाची पाच लाख १५ हजारांची फसवणूक केली. ही घटना मोशी परिसरात घडली. याबाबत ३९ वर्षीय व्यक्तीने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने एका ईमेलवरून मेल पाठवून व बनावट भरती फॉर्म दाखवून नोकरी लावतो असे सांगून पाच लाख १५ हजार रुपये घेतले. मात्र कोणतीही नोकरी लावली नाही. आरोपीने फसवणुकीनंतर मोबाइलवर रजा घेतो असे स्टेटस ठेवून मोबाइल बंद करून संपर्क तोडला. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
घरासमोर अस्वच्छता केल्याचा जाब विचारल्याने महिलेला गजाने मारहाण
घरासमोर अस्वच्छता केल्याची विचारणा केल्याने महिलेला गजाने मारहाण केल्याची घटना मुळशी तालुक्यातील लवळे गावात घडली.
एका महिलेने याबाबत बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला फिर्यादी महिलेने “तू माझ्या घरासमोर येऊन अस्वच्छता का करतोस?” अशी विचारणा केली. या कारणावरून संतापलेल्या आरोपीने जा तुला काय करायचे ते कर, मी तुझ्याकडे बघून घेईल, असे म्हणत लोखंडी गजाने डोक्यात व हातावर मारहाण केली. तसेच आरोपीच्या आई-वडील यांनी शिवीगाळ करून दमदाटी केली. बावधन पोलीस तपास करत आहेत.
चिखलीत रिक्षाचालकाला खंडणीसाठी मारहाण; तिघांना अटक
खंडणी न दिल्याने रिक्षाचालकाला कोयत्याच्या उलट्या बाजूने मारहाण करून जखमी करण्यात आले. हा प्रकार चिखली परिसरात उघडकीस आला आहे.
याप्रकरणी रिक्षाचालकाने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत उर्फ परशुराम सत्यवान तुपे (२५, मोईगाव, ता. खेड), सौरभ उर्फ गोविंद संभाजी तुपे (२२, पाटीलनगर, चिखली), कुणाल भंडारी (२५, मोईगाव, ता. खेड) या तिघांना अटक केली आहे. त्यांच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीकडे दोन हजार रुपये दरमहा खंडणी मागितली. पैसे न दिल्याने डोक्यात उलट्या कोयत्याचा वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी परिसरात कोयता दाखवून दहशत माजवली तसेच मोबाइलवरून धमक्या देत खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला. चिखली पोलीस तपास करत आहेत
रिक्षा मागे घेण्यास सांगितल्याने मारहाण; परस्पर विरोधी गुन्हे दाखल
रस्त्यात आडवी आलेली रिक्षा मागे घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून दाम्पत्य आणि त्यांच्या एका नातेवाईकाला मारहाण करून अश्लील शिवीगाळ करण्यात आली. ही घटना आळंदीत घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रविंद्र जंगलू जाधव (४२, वडगाव रोड, आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गोकुळ माळी (२५) आणि रामभाऊ माळी (४४, दोघेही रा. आळंदी) यांना अटक केली आहे. तसेच दोन महिला आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव हे पत्नीसह घरी जात होते. त्यावेळी आरोपींच्या रिक्षाने रस्ता अडवल्याने त्यांनी ती मागे घ्यावी असे सांगितले. त्याचा राग येऊन आरोपींनी फिर्यादीच्या पत्नीला हाताने मारहाण करत शिवीगाळ केली. जाधव हे कारण विचारण्यासाठी आरोपींच्या घरी गेले असता अनोळखी व्यक्तीसह आरोपींनी राग मनात धरून फिर्यादीचा मेहुण यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. तसेच फिर्यादीच्या पत्नीला दोन महिला आरोपींनीही मारहाण केली.
याच्या परस्पर विरोधी फिर्याद रामभाऊ बारकू माळी (४३, वडगाव रोड, आळंदी) यांनी दिली आहे. त्यानुसार रविंद्र जाधव यांना अटक करण्यात आली आहे. एका महिलेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करत आहेत.
कोयता बाळगणारा तडीपार गुंड अटकेत
तडीपार असूनही पिंपरी-चिंचवड हद्दीत प्रवेश करून धारदार कोयता बाळगणाऱ्या सराईताला पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई एच.ए. मैदान परिसरात करण्यात आली.
अमर ऊर्फ रिंकू कुलवंतसिंग चौहान (३५, नेहरूनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार संतोष भानुदास राजपूत यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रिंकू चौहान याला पोलीस उपायुक्त परीमंडळ एक यांनी एक वर्षापूर्वी म्हणजे२५ ऑक्टोबर २०२४ रोजी दोन वर्षांसाठी पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण हद्दीतून तडीपार केले होते. मात्र आरोपीने हा आदेश भंग करून परवानगीशिवाय शहरात प्रवेश केला व कोयता बाळगून दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत होता. मात्र त्यापूर्वीच एच. ए. मैदान परिसरातून त्यास ताब्यात घेण्यात आले. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.
