पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी पूर्वपरीक्षा २०२६साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी सामाइक प्रवेश परीक्षा (सीईटी) २७ जुलै रोजी आयोजित करण्यात आली असून, या परीक्षेसाठी उमेदवारांना २६ जूनपर्यंत अर्ज भरता येणार आहे.
राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या संचालक डॉ. भावना पाटोळे यांनी याबाबत प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली. उच्च शिक्षण विभागांतर्गत मुंबईची राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्वप्रशिक्षण केंद्र, पुण्याचे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका संचलित सावित्रीबाई फुले अकादमी या संस्थांमार्फत विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
उमेदवारांचे प्रवेश लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे ठरवले जाणार असल्याने मुलाखतीचे वेळापत्रक परीक्षेनंतर जाहीर केले जाईल. सीईटीचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी प्रवेशासाठीच्या संकेतस्थळावर नोंदणी करून त्यांच्या पसंतीचे प्रशिक्षण केंद्र प्रवेशासाठी निवडायचे आहे.
प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना कोणतीही माहिती वैयक्तिकरीत्या उपलब्ध करून दिली जाणार नाही. प्रवेश प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती, सविस्तर जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम, पात्रता, ऑनलाइन अर्ज भरण्याविषयी सूचना याबाबतची माहिती http://www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.