शिवराज्याभिषेकदिनाचे औचित्य साधून फ्रेरीया इंडिका या दुर्मीळ वनस्पतीचे रविवारी ‘शिवसुमन’ असे नामकरण करण्यात आले. दुर्गदुर्गेश्वर रायगड येथे शिवसुमनची ५० रोपे लावण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे जिल्ह्य़ाचे निसर्ग प्रतीकात्मक मानचिन्ह फूल म्हणून फ्रेरीया इंडिका ही वनस्पती ज्ञात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि या फुलाची शिवनेरी ही जन्मभूमी, सुदर्शनचक्राप्रमाणे या फुलाचा असलेला आकार, भगवा-लाल रंग, या वनस्पतीचा दुर्मीळ आढळ आणि प्रदेशनिष्ठता ही पार्श्वभूमी ध्यानात घेता शिवप्रेमींसह निसर्गप्रेमींनी आणि अभ्यासकांनी ‘शिवसुमन’ नामकरणाला अनुमोदन दिले.

बायोस्फिअर्स, श्री शिवाजी रायगड  स्मारक मंडळ, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड, समर्थ भारत आणि अन्य सेवाभावी संस्थांतर्फे शिवराज्याभिषेकदिनाचे औचित्य साधून रायगडावरील राजसभेवर सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर फ्रेरीया इंडिका या वनस्पतीबाबत मराठी आणि इंग्रजी भाषेत सचित्र माहिती देणाऱ्या पत्रकाचे आणि प्रकाशचित्राचे अनावरण करण्यात आले. रायगड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, मनोहर भोईर, श्री. रुपेश म्हात्रे, विश्व हिंदू परिषदेचे शंकर गायकर, बजरंग दलाचे प्रांत संयोजक उमेश गायकवाड, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगडचे अध्यक्ष सुनील पवार, सनी ताठेले, भरत गोगावले, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सुधीर थोरात, सौरव करडे, संतसाहित्याचे अभ्यासक दत्तात्रय गायकवाड, बायोस्फिअर्सचे डॉ. सचिन पुणेकर या वेळी उपस्थित होते.

वनस्पती फक्त महाराष्ट्रातच

फ्रेरीया इंडिका ही वनस्पती जगभरात फक्त महाराष्ट्र राज्यातच आढळून येते. सह्य़ाद्री पर्वतरांगांमध्ये नगर (रंधा धबधबा), पुणे (शिवनेरी गड, वज्रगड, डोंगरवाडी, पिंपरीचे तळे), रायगड, सातारा (शिवथरघळ, महाबळेश्वर, सज्जनगड), नाशिक (त्र्यंबकेश्वर, अंजनेरी) अशा ठिकाणी तीव्र डोंगर उतार आणि कडय़ावर आढळून येते. स्थानिक भाषेत काही ठिकाणी या वनस्पतीला शिंदळ माकुडी म्हणून संबोधतात.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Freya indica plant called shivasuman
First published on: 18-06-2019 at 01:35 IST