पुणे : इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीची निवडयादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार राज्यातील २ लाख ५१ हजार ८०४ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना १८ ते २१ जुलै या कालावधीत महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्यात ९ हजार ४८३ कनिष्ठ महाविद्यालयांतील २१ लाख ३२ हजार ९६० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पहिल्या फेरीत ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला होता.
त्यातील ४ लाख ५७ हजार ८४१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले होते. त्यापैकी ४ लाख ३२ हजार २८७ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला होता. त्यानंतर आता दुसऱ्या फेरीत २ लाख ५१ हजार ८०४ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. त्यात विज्ञान शाखेसाठी १ लाख २९ हजार ३५, वाणिज्य शाखेसाठी ६९ हजार ४४२, कला शाखेसाठी ५३ हजार ३२७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे.
विभागनिहाय आढावा घेतला असता, मुंबई विभागातील सर्वाधिक ७९ हजार ४०३ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. त्या खालाखोल पुणे विभागातील ४३ हजार ७०२, छत्रपती संभाजीनगर विभागातील २९ हजार ३५८, नाशिक विभागातील २३ हजार ७८९, नागपूर विभागातील २२ हजार ४०, अमरावती विभागातील २१ हजार १०४, कोल्हापूर विभागातील १८ हजार ७६८, लातूर विभागातील १३ हजार ६४० विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला आहे.
६ लाख ३२ हजार १९४ – पहिल्या फेरीत प्रवेश जाहीर
४ लाख ५७ हजार ८४१ – पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी
२ लाख ५१ हजार ८०४ – दुसऱ्या फेरीत प्रवेश जाहीर
दुसऱ्या फेरीत प्रवेश जाहीर झालेल्यांची विभागनिहाय संख्या
मुंबई : ७९ हजार ४०३
पुणे : ४३ हजार ७०२
छत्रपती संभाजीनगर : २९ हजार ३५८
नाशिक : २३ हजार ७८९
नागपूर : २२ हजार ४०
अमरावती : २१ हजार १०४
कोल्हापूर : १८ हजार ७६८
लातूर : १३ हजार ६४०
दुसऱ्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करण्याचा कालावधी : १८ ते २१ जुलै.