पुणे : कोथरूड भागात एका संगणक अभियंताला मारहाण प्रकरणात प्रसार झालेला गुंड गजानन मारणे याचा जवळचा साथीदार रुपेश मारणे याला मुळशी परिसरातून मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली.

संगणक अभियंता तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गुंड गजा मारणे व त्याच्या साथीदारांविरुद्ध १७ फेब्रुवारी २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. त्या प्रकरणामध्ये मारणे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये ( मकोका ) कारवाई करण्यात आली.

त्या गुन्ह्यात मारणे याचा साथीदार गुंड रुपेश कृष्णराव मारणे ( वय ४०, रा. शास्त्रीनगर, कोथरूड ) फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागात पथके पाठवली होती. त्याचा ठावठिकाणा लागलेला नव्हता.

रुपेश मारणे याला पोलिसांनी मुळशी परिसरातून अटक केली. रुपेश मारणे गेले दहा महिने पोलिसांना गुंगार देत होता. त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.