पुण्यात बुधवारी सकाळी आठ वाजता श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या विसर्जनाने कालपासून शहरात सुरू असलेल्या विसर्जन सोहळ्याची सांगता झाली. काल सकाळी दहाच्या सुमारास मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जन मिरवणुकांनी विसर्जन सोहळ्याची सुरुवात झाली होती. यानंतर शहरातील प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती मंडपातून बाहेर पडले होते. त्यामुळे पुण्यात काल दिवसभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी रस्त्यांवर नेहमीप्रमाणे आकर्षक देखावे असलेले चित्ररथ आणि ढोलपथकांच्या तालावर काढण्यात आलेल्या मिरवणुका पाहायला मिळाल्या. संध्याकाळपर्यंत मानाच्या गणपतींचे विसर्जन पार पडल्यानंतर अन्य सार्वजनिक मंडळांचे गणपती विसर्जनासाठी मंडपातून बाहेर पडले. तेव्हा रस्त्यांवर आकर्षक रोषणाई केलेले चित्ररथ पाहायला मिळाले. पुणेकरांसह राज्यभरातून आलेल्या लोकांनी हे गणपती पाहण्यासाठी नेहमीप्रमाणे चौका-चौकात गर्दी केली होती. आज सकाळपर्यंत ही लगबग सुरु होती.
काल दिवसभरातही ढोल-ताशांच्या गजरात नाचत-गाजत पुणेकरांनी गणपतींना निरोप दिला. काल १२ वाजल्यानंतर नियमाप्रमाणे डीजे बंद करण्यात आले होते. त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात येत होता. तत्पूर्वी सावर्जनिक गणेशोत्सवाची सुरुवात भाऊ रंगारी की लोकमान्य टिळक यांनी केली यावरुन सुरु झालेल्या वादाचे पडसाद पुण्यातील मिरवणुकीत पहायला मिळाले. भाऊ रंगारी मंडळाने महापालिकेकडून मिळणारा मानाचा नारळ स्वीकारला नाही. हा सन्मान न स्वीकारताचा भाऊ रंगारी मंडळाने आपला रथ अलका चौकातून रवाना केला.
ठळक घडामोडी:
श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन
दगडूशेठ गणपती टिळक चौकात पोहचला, थोड्याच वेळात विसर्जन
पुण्यात डीजेला पुन्हा एकदा सुरूवात
भाऊ रंगारी मंडळाने महापालिकेचा मानाचा नारळ स्वीकारला नाही
अखिल मंडई मंडळाचा गणपती पहाटे ५.४५ च्या सुमारास दाखल होतो आहे.
अखिल मंडई मंडळाच्या गणपतीचे थोड्याच वेळात विसर्जन
पुण्यात श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपतीची मिरवणूक
पहाटे ३ वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावर
पुण्यात रात्री १२ वाजता डीजे बंद आणि ढोल ताशा पथकांचे वादन सुरू
१२ वाजताही पुणे महापालिकेबाहेर वाहनांच्या रांगाच रांगा
रात्री १.३० वाजण्याच्या सुमाारासही पुण्यातल्या चारही मुख्य रस्त्यांवर भाविकांची गर्दी
रात्री १ वाजण्याच्या सुमारास ढोल ताशा पथकांचा नाद
मानाच्या पाचही गणपतींचे शिस्तबद्ध विसर्जन