पुणे : वैभवशाली गणेशोत्सवाच्या आनंदपर्वाचा शनिवारपासून (७ सप्टेंबर) श्रीगणेशा होत असून गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४ वाजून ४० मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ५१ मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मध्यान्हीनंतरही करता येऊ शकेल. गणेशोत्सव शनिवारपासून (७ सप्टेंबर) सुरू होत आहे. या वर्षी गणेशोत्सव दहाऐवजी अकरा दिवसांचा आहे. शुक्रवारी (६ सप्टेंबर) भाद्रपद शुद्ध तृतीया म्हणजे हरितालिका पूजन आहे. वाळूची शंकराची पिंड करून महिला त्याची पूजा करतात आणि दिवसभर उपवास करतात. शनिवारी (७ सप्टेंबर) भाद्रपद शुद्ध चतुर्थीला भारतात सर्वत्र श्रीगणेश चतुर्थी साजरी करण्यात येणार आहे. ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४ वाजून ५० मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ५१ मिनिटांपर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल. त्यासाठी विशिष्ट नक्षत्र, वार, योग, विष्टिकरण (भद्रा) तसेच राहूकाल वर्ज्य नाही. कोणतीही कोष्टके पाहण्याची आवश्यकता नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मध्यान्हीनंतरही करता येऊ शकेल, अशी माहिती ‘दाते पंचांगकर्ते’चे मोहन दाते यांनी दिली. हे ही वाचा.बिबवेवाडीतून तीन शाळकरी मुली बेपत्ता; पोलिसांच्या तत्परतेमुळे शोध मुली कल्याणमध्ये सुखरुप सापडल्या काही जणांकडे गणेशोत्सव दीड दिवस, पाच, सात दिवस तर काही जणांकडे अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा केला जातो. आपल्याकडे जेवढ्या दिवसांचा गणेशोत्सव असेल तेवढे दिवस रोज गणेशाची सकाळी आणि संध्याकाळी पूजा, आरती अवश्य करावी. गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना केलेल्या पार्थिव गणेश मूर्तीचे विसर्जन होणे आवश्यक आहे आणि ते पाण्यामध्ये करावे असे धर्मशास्त्र सांगते. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे असे नसून पाण्यात विसर्जन करावे असे आहे. त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र कृत्रिम तलावामध्ये, घरी मोठ्या बादलीमधील पाण्यात सुद्धा विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी. गणेश विसर्जन अनंत चतुर्दशी या वर्षी मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी आहे. हा गणेश स्थापनेपासून अकरावा दिवस आहे. गणेशाचा वार असला तरीही परंपरेप्रमाणे विसर्जन करावे, या दिवशी चतुर्दशी तिथी दुपारी पावणेबारा वाजताच संपत असली, तरीही त्यानंतर विसर्जन करता येईल. पुढच्या वर्षी गणरायाचे लवकर म्हणजे २७ ऑगस्ट या दिवशी होणार आहे. हे ही वाचा.NCP Ajit Pawar Proup : “एकाच महिलेला किती पदे देणार?”, अजित पवार गटात वादाची ठिणगी? रुपाली पाटील-ठोंबरे विरुद्ध चाकणकर वाद चव्हाट्यावर गौरी (महालक्ष्मी) आवाहन मंगळवारी (१० सप्टेंबर) अनुराधा नक्षत्रावर रात्री ८ वाजून ०४ मिनिटांपर्यत कधीही गौरी आवाहन करता येईल. ज्येष्ठा नक्षत्र मध्यान्ही असलेल्या दिवशी पूजन करावे. बुधवारी (११ सप्टेंबर) नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे असल्याने गुरुवारी (१२ सप्टेंबर) रात्री ९ वाजून ५३ मिनिटांपर्यंत गौरी विसर्जन करता येईल.