पुणे : गणरायाला निरोप देण्यासाठी महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधेचा फायदा घेऊन दीड दिवसांच्या २१०० गणेशमूर्तींचे विसर्जन शहरातील महत्त्वाच्या घाटांवर करण्यात आले, तर दोन हजार किलो निर्माल्य महापालिकेकडे गोळा झाले. विसर्जन हौद, लोखंडी टाक्या, मूर्तिदानाच्या माध्यमातून या गणेशमूर्ती महापालिकेकडे जमा झाल्याची माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.
गणेशमूर्तींचे विसर्जन करताना त्याबरोबर हार, पाने, फुले, हे निर्माल्य नदीच्या पाण्यात जाऊन नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये, यासाठी आवश्यक ती काळजी महापालिकेने घेतली आहे. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक राबविण्याचा संकल्प महापालिका प्रशासनाने केला आहे. यासाठी महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ३८ कृत्रिम हौद, २८१ ठिकाणी ६४८ लोखंडी टाक्या उभारण्यात आल्या आहेत. तसेच, ३३८ ठिकाणी निर्माल्य कलश-कंटेनर आणि २४१ मूर्तिदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.
शहरातील १५ प्रमुख विसर्जन घाटांवर फायरमन, महापालिकेच्या सेवकांसह जीवरक्षक २४ तास तैनात करण्यात आले आहेत. नदीपात्रासह ओढे, नाले परिसरात दुर्घटना घडू नयेत, यासाठी आवश्यक पोलिस बंदोबस्तदेखील ठेवण्यात आला आहे. दीड दिवसांच्या घरगुती गणरायाला निरोप देण्यासाठी दुपारनंतर घाटांवर नागरिक येत होते. घाटांवर नागरिकांना सुरक्षितपणे गणेशमूर्तींचे विसर्जन करता यावे, यासाठी कृत्रिम हौद, लोखंडी टाक्या महापालिकेने उभारल्या आहेत.
गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरातील प्रमुख घाटांवर २१०० गणेशमूर्ती विसर्जसाठी आणण्यात आल्या. यामध्ये घरगुती गणेशमूर्तींचा समावेश होता. महापालिकेने बांधलेल्या हौदात ४२०, लोखंडी टाक्यांमध्ये १५००, तर महापालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत २१६ मूर्ती संकलित करण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन सुरू होते.
दोन हजार किलो निर्माल्य जमा
महापालिकेने निर्माल्य गोळा करण्यासाठी प्रत्येक घाटांवर, विविध भागांत निर्माल्य कलश ठेवले आहेत. यामध्ये दोन हजार किलो निर्माल्य जमा करण्यात आले. निर्माल्य वेगळे करण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सर्वांत अधिक ३८० किलो निर्माल्य कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयातून जमा झाले आहे.