पुणे : श्रद्धा आणि भक्तिभावाने भारलेल्या गणेशोत्सवाच्या आनंद सोहळ्याची शनिवारी (६ सप्टेंबर) सांगता होणार आहे. ढोल-ताशांचा निनाद, बँडपथकांनी वाजविलेल्या मधुर सुरावटी आणि ‘मंगलमूर्ती मोरया’चा गजर करीत लाडक्या गणरायाला वैभवशाली विसर्जन मिरवणुकीने निरोप देण्यासाठी सारे सज्ज झाले आहेत. मानाच्या आणि प्रमुख मंडळांची विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली असून, सर्वांनाच शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याची प्रतीक्षा आहे. विसर्जन मिरवणुकीतील सहभागावरून मंडळांमध्ये असलेला तिढा संवादातून सुटला असून, प्रत्यक्ष मिरवणूक कशी पार पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गणेश चतुर्थीला सुरू झालेल्या मंगलमय उत्सवाने संपूर्ण शहर गणरंगी रंगून गेले होते. दररोजची पूजा, आरती, अथर्वशीर्षपठण अशा धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक उपक्रमांनी उत्सवामध्ये रंग भरले गेले. दहा दिवसांमध्ये मानाच्या गणपती मंडळांसह प्रमुख गणेश मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्याचा नागरिकांमध्ये उत्साह होता. या उत्सवाचा अनंत चतुर्दशीला निघणाऱ्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीने कळसाध्याय गाठला जाणार आहे. गणरायाला निरोप देताना डोळ्यांच्या कडा पाणावणार असल्या, तरी गणेशाच्या निरोप समारंभानिमित्त काढण्यात येणाऱ्या विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणताही कसर राहू नये यासाठी कार्यकर्ते झटत आहेत.
महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह मानाच्या गणपतींना पुष्पहार अर्पण करून आरती झाल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. श्री कसबा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी या ग्रामदैवतांच्या नावाने असलेल्या मंडळांच्या मिरवणुकीनंतर लक्ष्मी रस्त्यावर पहिल्यांदा गुलाल उधळणारे मंडळ असा लौकिक असलेल्या श्री गुरुजी तालीम मंडळाचा गणपती मार्गस्थ होईल. शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करणाऱ्या श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानंतर केसरीवाडा हा मानाचा पाचवा गणपती मार्गक्रमण करेल.
प्रत्येक मंडळासमोर कोणते बँडपथक असणार, कोणती ढोल-ताशा पथके असतील आणि मिरवणूक कोणत्या चौकात किती वाजता पोहोचणार याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. पोलीस आणि महापालिका प्रशासन मिरवणुकीसाठी सज्ज झाले आहे. विसर्जन मिरवणुकीत कोणाला त्रास होऊ लागला, तर त्यावर उपचार करण्यासाठी आपत्कालीन वैद्यकीय मदत पथक तयार ठेवण्यात आले आहे. लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता आणि टिळक रस्ता या मिरवणुकीच्या चारही प्रमुख मार्गांवर रुग्णवाहिका तैनात आहेत. विसर्जन मिरवणुकीसाठी आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
लक्ष्मी रस्त्यावरील श्री गजानन मंडळाचे यंदा ८६ वे वर्ष असून, श्री गरुड गणपती मंडळाचे यंदा ८२ वे वर्ष आहे. विसर्जन मिरवणुकीला होणारा विलंब ध्यानात घेऊन या दोन्ही मंडळांनी संयुक्त मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. या संयुक्त मिरवणुकीचे यंदा ११ वे वर्ष आहे.
आज हलक्या सरींचा अंदाज गणपती विसर्जनासाठी शहरातील मंडळे, प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. शहरात उद्या (शनिवारी) हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छत्तीसगडच्या परिसरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेले दोन दिवस राज्यभरात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाचे प्रमाण कमी होण्याची चिन्हे आहेत.