पुणे : मोटार पार्किंगच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण करून त्याच्या गळ्यातील २५ हजारांची सोन्याची साखळी हिसकावून नेणाऱ्या टोळीला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. बबलू विवेक कोठारी (वय ३०, रा. बालाजीनगर, धनकवडी ), लोकेश विवेक कोठारी (वय २१) आणि शाम चांदेकर (वय २१ रा. धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना ३ जून रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास धनकवडीतील काशिनाथ पाटीलनगर येथे घडली होती. याप्रकरणी थेरगावमध्ये राहणाऱ्या तरुणाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण थेरगावमधील असून, ३ जून रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास धनकवडीतील बालाजीनगर परिसरात आला होता. त्या ठिकाणी मोटार लावत असताना टोळक्याने त्याच्याबरोबर हुज्जत घातली. त्याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले. त्यानंतर त्याच्या गळ्यातील २५ हजारांची सोन्याची साखळी चोरून नेली.
घटनेची माहिती मिळताच, सहकारनगर पोलिसांनी तातडीने तपासाला गती दिली. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे तपास करून आरोपींना अटक केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील तपास करीत आहेत.