पुणे : कामावरून घरी निघालेल्या दुचाकीस्वार दाम्पत्यावर टोळक्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सिंहगड रस्ता भागात घडली. टोळक्याने कोयत्याने वार केल्याने तरुण जखमी झाला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दाम्पत्य सिंहगड रस्ता भागात राहायला आहे. शुक्रवारी सायंकाळी दाम्पत्य दुचाकीवरून घरी निघाले होते. सिंहगड रस्त्यावरील क्षेत्रीय कार्यालयाजवळ दुचाकीवरुन टोळके निघाले होते. त्या वेळी किरकोळ कारणावरून दाम्पत्याचा टोळक्याशी वाद झाला. क्षेत्रीय कार्यालयासमोरील रस्त्यावर टोळक्याने दाम्पत्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने दाम्पत्यावर कोयता उगारला. झटापटीत टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार केला. आरोपी दुचाकीवरून पसार झाले. या घटनेनंतर घाबरलेल्या दाम्पत्याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात धाव घेतली.

तरुणाच्या डोक्यावर कोयत्याचा वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पसार झालेल्या आरोपींवर कडक कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे. शहरात रस्त्यावर वादावादीच्या घटना घडतात.

बाणेर भागात गेल्या वर्षी एका मोटारचालकाने किरकोळ वादातून दुचाकीस्वार तरुणीला मारहाण केली होती. लष्कर भागात दुचाकीस्वार महिला आणि तिच्या मुलीला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. हडपसर भागात टोळक्याने मोटारचालक तरुणाचा किरकोळ वादातून खून केला होता.