पुणे : टोळक्याने वाहनांची तोडफोड करून दहशत माजविल्याची घटना लष्कर आणि ओैंध भागात घडली. या प्रकरणी पोलिसांकडून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. गणेशोत्सवात शहरात तोडफोडीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराट उडाली आहे.

लष्कर भागातील पूना काॅलेजसमोरील गल्लीत वाहनांची तोडफोड करण्याची घटना ३० ऑगस्ट रोजी रात्री घडली. या प्रकरणी रुद्र शिंदे, प्रथमेश, यश खरारे (रा. हरकानगर, भवानी पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला लष्कर भागात राहायला आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (३० ऑगस्ट) रात्री साडेनऊच्या सुमारास पूना काॅलेजसमाेरील गल्लीत आले. चित्रगुप्त अपार्टमेंट परिसरातील वाहनांची तोडफोड करुन आरोपी पसार झाले. सहायक फौजदार बरडे तपास करत आहेत.

ओैंध भागात टोळक्याने दहशत माजवून मोटारीसह दुचाकींची तोडफोड केल्याची घटना सोमवारी (१ सप्टेंबर) मध्यरात्री घडली. याबाबत एकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ओैंध भागातील टेरेसा रस्त्यावर लावलेली मोटार, तसेच दुचाकींची मध्यरात्री लाकडी दांडक्याने तोडफोड केल्याची घटना घडली. तोडफोड करुन टोळके पसार झाले.

पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत. गणेशोत्सवात तोडफोडीच्या घटना घडल्याने घबराट उडाली आहे. शहर परिसरात वर्षभरापासून वाहन तोडफोडीच्या घटना वाढल्या आहेत. महिनाभरापूर्वी धनकवडी, भवानी पेठेतील मंजुळाबाई चाळ, येरवडा परिसरात तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. गेल्या दीड वर्षात वाहन तोडफोड, जाळपोळीच्या १५० हून जास्त घटना शहर परिसरात घडल्या आहेत.