पुणे : भर चौकात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश मंगळवारी न्यायालयाने आदेश दिले. या आदेशानुसार गौरवची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात शनिवारी सकाळी गौरव मनोज आहुजा (वय २५, रा. साठे काॅलनी, शुक्रवार पेठ) याने भर चौकात आक्षेपार्ह कृत्य केले. गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश प्रकाश ओसवाल (वय २२, रा. मार्केट यार्ड) हे पार्टी करून मोटारीतून निघाले होते. भर चौकात गौरवने लघुशंका केल्याची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर तो पसार झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून गौरव आणि भाग्येश याला अटक केली. गौरवला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर गाैरवला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

गौरवला पुण्यातून पसार होण्यासाठी त्याला कोणी मदत केली, या दृष्टीने तपास करण्यात येणार आहे. तपासासाठी गौरवला पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील योगेश कदम आणि तपास अधिकारी विजय ठाकर यांनी न्यायालयाकडे केली. बचाव पक्षाकडून ॲड. सुरेंद्र आपुणे यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने गौरवला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

भर चौकात लघुशंका करणारा गौरव आहुजाची महागडी मोटार पोलिसांनी जप्त केली. आहुजाच्या मोटारीवर असलेली वाहन क्रमाकांची पाटी काढून टाकल्याचे निदर्शनास आले. त्याच्या मोटारीवरील असलेली वाहन क्रमांकाची पाटी काढून टाकल्याचे दिसून आले आहे. वाहन क्रमांकाची पाटी कोणी काढली, याबाबत विचारणा केली असता गौरवने उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे पोलिसांनी न्यायालायात सांगितले होते. पोलिसांनी गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश याची येरवडा परिसरातून धिंड काढली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोटारीत अमली पदार्थांचे अंश ?

गौरवची अलिशान मोटार पोलिसांनी जप्त केली आहे. गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश यांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गौरवच्या मोटारीत अमली पदार्थांचे अंश सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची माेटार रासायनिक विश्लेषणसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले