पुणे : आर्थिक तोट्यात असलेल्या पीएमपीने उत्पन्नवाढीसाठी जागेचा वापर व्यावसायिक दृष्टीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत अदानी कंपनीला पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सात ठिकाणी चार्जिंग स्थानके उभारण्याचे काम देण्यात आले आहे. त्यापैकी चार चार्जिंग स्थानके उभारण्याचे काम या कंपनीकडून हाती घेण्यात आले आहे. या माध्यमातून उत्पन्नाच्या ३२.५ टक्के रक्कम पीएमपीला मिळणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील दहा लाखांपेक्षा जास्त प्रवाशांची पीएमपी ही प्रमुख सार्वजनिक सेवा आहे. मात्र पीएमपीचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षीही पीएमपीला एक हजार कोटींची संचलन तूट आल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर उत्पन्नवाढीसाठी विविध उपाययोजना पीएमपी प्रशासनाकडून हाती घेण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जागांचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करण्यात येणार असून, खासगी चार्जिंग स्थानके उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

यासंदर्भात पीएमपी प्रसासनाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यामध्ये पीएमपीला सर्वाधिक जास्त रक्कम देण्याची तयारी अदानी कंपनीकडून दर्शविण्यात आली. त्यामुळे त्यांच्याबरोबर करार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात सात ठिकाणी खासगी चार्जिंग स्थानकांची उभारणी करण्यात येणार आहे.

अदानी कंपनीबरोबर करार प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत चार चार्जिंग स्टेशन्सची कामे पूर्ण होतील. त्यानंतर चार्जिंग स्टेशन्समधून सुविधा देण्यास प्रारंभ होईल.
-नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

अदानी कंपनीकडून पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत हिंजवडी फेज-२, भक्ती-शक्ती, भोसरी आणि पुण्यात कात्रज, बाणेर-सूस रोड, पुलगेट, डेक्कन जिमखाना या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी २४ तास चार्जिंगची सोय उपलब्ध असणार आहे. यामुळे विजेवर धावणाऱ्या दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांचा चार्जिंग उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा : कोल्हापुरात अदानी उद्योग समूहाच्या जलविद्युत प्रकल्पाविरोधातील राजकीय धार वाढली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीएमपीएलच्या जागेत उभारण्यात येणारी चार्जिंग स्टेशन सुरू झाल्यावर अदानी कंपनीला मोकळी जागा विनामोबदला वापरण्यासाठी मिळणार आहे.