लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : प्रसिद्ध कवी-गज़लकार आणि सनदी लेखापाल राजेंद्र सुमतीलाल शहा (वय ६३) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि सून असा परिवार आहे. शहा यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पोपटलाल शहा यांचे राजेंद्र हे नातू होत.

कविवर्य सुरेश भट आणि डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांचे शिष्य असलेल्या शहा यांचे ‘जपण्यासारखं बरंच काही’ आणि ‘एकांतस्वर’ हे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. गेल्या चार दशकांपासून काव्यलेखनाच्या प्रांतात कार्यरत असलेल्या शहा यांनी विविध कविसंमेलन आणि गज़ल मुशायरामध्ये सहभाग घेतला होता. ज्येष्ठ भावगीतगायक गजाननराव वाटवे, यशवंत देव, भीमराव पांचाळे, नीलेश मोहरीर आणि राहुल घोरपडे यांनी त्यांच्या रचना स्वरबद्ध केल्या होत्या. रवींद्र साठे, भीमराव पांचाळे, अनुराधा मराठे आणि स्वप्नील बांदोडकर यांनी विविध कार्यक्रमात शहा यांच्या काव्यरचना सादर केल्या होत्या. साहित्यदीप प्रतिष्ठानचा गज़लदीप पुरस्कार, नाशिक येथील कलायतन संस्थेचा बालकवी पुरस्कार त्यांना मिळाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने शहा यांच्या ‘एकांतस्वर’ कवितासंग्रहाला कवी यशवंत स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा त्यांचा सार्वजनिक जीवनातील अखेरचा कार्यक्रम ठरला.