भारतीय जनता पार्टीच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना भाजपाकडून उमेदवारी मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, अखेरच्या क्षणी भाजपाने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्याऐवजी हेमंत रासने यांना उमेदवारी दिली.

सध्या कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष जोरदार प्रचार करताना दिसत आहे. भाजपाचा हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडीकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.

अशी एकंदरीत स्थिती असताना भाजपा खासदार गिरीश बापट यांनी प्रकृती ठीक नसताना प्रचाराला हजेरी लावली. ते ऑक्सिजन सिलेंडरसह व्यासपीठावर आले. यावेळी पुणेरी पगडी आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. पण नाकात ऑक्सिजनची नळी असताना गिरीश बापट यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांच्या हातालाही ऑक्सिमीटर लावण्यात आला होता. अशा अवस्थेतही ते भाजपाच्या प्रचारासाठी आले होते. श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत आहे. मागील अनेक दिवसांपासून बापट एका मोठ्या आजाराशी लढा देत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरं तर, भाजपाकडून हेमंत रासने यांना तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर याना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही पक्षांकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. मुक्ता टिळक यांच्याआधी कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून गिरीश बापट यांनी जवळपास ३० वर्षे नेतृत्व केलं आहे. तसेच बापट हे पुणे शहराचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे गिरीश बापट यांची कसबा मतदार संघ आणि पुणे शहरावर मजबूत पकड आहे.