कासारवाडी भागात राहणाऱ्या चार वर्षांच्या बालिकेचे अपहरण करून तिचा खून करण्यात आल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील वातावरण ढवळून निघाले होते. कासारवाडी भागात रेल्वे रुळावर पडलेला त्या बालिकेचा मृतदेह ९ डिसेंबर २०१२ रोजी सापडला होता. शवविच्छेदन अहवालात तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे तसेच तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर कासारवाडी भागात जनक्षोभ उसळला होता. राजकीय पक्षांनी मोर्चे काढून बालिकेच्या मारेकऱ्याला पकडण्याची आग्रही मागणी केली होती. या गुन्ह्य़ाचा तपास करताना पोलिसांनी पिंपरी-चिंचवड शहर पिंजून काढले होते. अनेकांची चौकशी करण्यात आली होती. बालिकेच्या खुनाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, पोलिसांना मारेकऱ्यांचा माग काढता आला नाही.

या बालिकेच्या आई वडिलांचा आंतरधर्मीय प्रेमविवाह होता. महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात राहणारे हे दाम्पत्य रोजगारानिमित्त पिंपरी-चिंचवड भागात स्थायिक झाले होते. त्यांची परिस्थिती तशी बेताची होती. तिचे वडील रिक्षा चालक आहेत. कासारवाडी भागात एका चाळीतील खोलीत त्यांनी संसार थाटला होता. त्यांची मुलगी चार वर्षांची झाल्यानंतर त्यांनी तिला त्या भागातील शिशुशाळेत घातले होते. ती ८ डिसेंबर २०१२ रोजी घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली. तिच्या आईने परिसरात शोध घेतला, मात्र तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे त्यांनी कासारवाडी पोलीस चौकीत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. बालिका बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. मात्र, रात्री उशिरापर्यंत तिचा शोध लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहाच्या सुमारास कासारवाडी रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रुळावर बालिकेचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने तेथे धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची माहिती त्या बालिकेच्या आई वडिलांनाही दिली.

रेल्वे रुळावर सापडलेला मृतदेह आपल्या मुलीचा असल्याचे पाहून त्यांनी हंबरडा फोडला. त्यांचा आक्रोश पाहून पोलिसही हेलावले. चार वर्षांची बालिका रेल्वे रुळापर्यंत कशी आली, असा प्रश्नही उपस्थित झाला. पोलिसांनी तातडीने मृतदेह यशवंतराव चव्हाण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलिसांना धक्का बसला. चिमुरडय़ा बालिकेचा गळा दाबून खून करण्यात आला होता. तिच्यावर अत्याचार केल्याचे शवविच्छेदन अहवालात वैद्यकीय तज्ज्ञांनी नमूद केले होते. दरम्यान, चार वर्षांच्या बालिकेचे अपहरण, तिच्यावर अत्याचार करून खून करण्यात आल्याचे वृत्त पिंपरी-चिंचवड भागात पसरले. हे वृत्त ऐकून नागरिकही संतापले. दरम्यान, ज्या ठिकाणी तिचा मृतदेह सापडला तो भाग लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने तपास कोणी करायचा यावरून वादंग झाला. अखेर बालिका बेपत्ता झाल्याचे प्रकरण भोसरी पोलिसांकडे तपासासाठी सोपवण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, गुन्हे शाखेचे निरीक्षक चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार तात्या तापकीर, महादेव धनगर, अविनाश शेवाळे, महेश खांडे, किरण काटकर यांनी तपास सुरू केला. गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त राजेंद्र भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या पथकानेही समांतर तपास सुरू केला. गुन्हे शाखेच्या सर्व पथकांना बालिकेच्या मारेकऱ्याचा माग काढण्याचा सूचना देण्यात आल्या होत्या.

दरम्यान, शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्या कुटुंबीयांची भेट घेऊन मारेकऱ्याला पकडण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. शिवसेनेकडून मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यांना २५ हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. ८ डिसेंबर रोजी घराबाहेर खेळणारी बालिका बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी स्थानिक नागरिकांकडे चौकशी सुरू केली. स्थानिक दुकानदार, फेरीवाले, रिक्षाचालक यांच्याकडून माहिती गोळा करण्यात आली. जवळपास आठवडाभर कासारवाडी तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक ठिकाण पोलिसांनी पिंजून काढले. कासारवाडी भागात जे संशयित आढळून आले त्यांचीही चौकशी करण्यात आली. त्या बालिकेला आमिष दाखवून पळवून नेल्याचा संशय होता. मारेकऱ्याबरोबर चार वर्षांच्या बालिकेला जाताना कोणी पाहिले का?, अशी विचारणा अनेकांकडे करण्यात आली. जेणेकरून संशयिताची माहिती मिळेल, हा त्यामागचा उद्देश होता. पिंपरी-चिंचवड भागातील झोपडपट्टय़ा, निर्जन जागांची पाहणी भोसरी पोलिसांकडून करण्यात आली. मात्र, पोलिसांच्या हाती काहीच माहिती आली नाही. त्यानंतर बालिकेच्या आई वडिलांकडे चौकशी करण्यात आली. त्यांचा कोणाशी वाद होता का, याचीही माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या नातेवाइकांचीही चौकशी केली. तपासाच्या अनुषंगाने पोलिसांचे पथक सोलापूर जिल्ह्य़ात गेले. तेथेही नातेवाइकांकडे चौकशी करण्यात आली होती. कर्नाटक भागात राहणाऱ्या नातेवाइकांकडे चौकशी करण्यात आली.

मारेकरी फिरस्ता असल्याचा संशय होता. त्या अनुषंगाने शिवाजीनगर ते लोणावळा भागात रेल्वे स्थानकाच्या परिसरात वावरणाऱ्या किंवा त्या भागात वास्तव्यास असणाऱ्या प्रत्येकाकडे चौकशी करण्यात आली. जवळपास तीन ते चार महिने पोलिसांनी दिवस-रात्र तपास केला. मात्र, तपासातील प्रत्येक बाजूवर पोलिसांना अपयश आले. अजूनही या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपास संथगतीने सुरू आहे. पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. भोसरी पोलीस तसेच गुन्हे शाखेतील प्रत्येक पथकाने मारेकऱ्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले, मात्र पोलिसांच्या पदरी अपयश आले.