पुणे : भारतीय संस्कृतीमध्ये दानाला विशेष महत्त्व असून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. परंतु, समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी वेळ देणे हे रक्तदानाइतकेच सर्वश्रेष्ठ दान आहे, असे मत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सुदर्शन हसबनीस यांनी व्यक्त केले.

कृ. ब. उर्फ अण्णा तळवलकर मेमोरियल ट्रस्टतर्फे सुदर्शन हसबनीस यांच्या हस्ते ज्ञान प्रबोधिनी मानसशास्त्र संस्थेच्या संचालक डॉ. अनघा लवळेकर यांना समाजशिक्षक पुरस्कार आणि कंझ्युमर शॉपी प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणाऱ्या मीनल मोहाडीकर यांना अनुकरणीय उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी हसबनीस बोलत होते.

हसबनीस म्हणाले, ‘निष्ठा, ध्येय आणि निश्चयाने वाटचाल करीत राहिल्यास सकारात्मकतेची पहाट होऊ शकते, हा विश्वास लवळेकर आणि मोहाडीकर या दोघींनी आपल्या कृतीतून दाखवून दिला आहे. या कामाचे हस्तांतरण करीत प्रकाश पेरणारी पुढची पिढी घडवली, हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे.’

डॉ. लवळेकर म्हणाल्या, ‘मानसशास्त्राच्या कार्यास पंचवीस वर्ष पूर्ण झाली असली तरी अजून भरपूर काम करण्यास वाव आहे. पूर्वसुरींच्या कामाला पथदर्शी मानून आम्ही हे काम पुढे नेत आहोत. योग्य वाटेवर चालत आहोत, याचे पुनरावलोकन करण्याची संधी या पुरस्काराने दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहाडीकर म्हणाल्या, ‘विविध जबाबदाऱ्या आणि सामाजिक चौकटींमुळे महिलांमधील आत्मविश्वासावर धूळ साचलेली असते. ती दूर करण्याचा प्रयत्न मी केला. आवड, निवड आणि सवड या त्रिसूत्रीवर काम करून भारतासह परदेशात महिला व्यावसायिक आणि उद्योजिकांचे जाळे आम्ही निर्माण केले आहे. आयुष्याच्या वळणावर अनाकलनीय अपघातांना सामोऱ्या गेलेल्या महिलांमधील बलस्थाने ओळखून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणल्याचे समाधान लाभत आहे.’ट्रस्टचे श्रीकांत कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. चारुदत्त आलेगावकर यांनी आभार मानले. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले.