विमानतळावर सीमाशुल्क विभागाची तस्करांवर नजर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आखाती देशातून तस्करी करून सोने आणले जाते. गेल्या काही वर्षांपासून सीमाशुल्क विभागाकडून (कस्टम) सोन्याची तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे तस्करीच्या प्रकारांना आळा बसला आहे. सणासुदीच्या काळात आखाती देशातून तस्करी करून सोने आणण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने सीमाशुल्क विभागाकडून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.

गेल्या महिनाभरात सीमाशुल्क विभागाकडून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आखाती देशातून आलेल्या प्रवाशांकडून मोठय़ा प्रमाणावर सोने पकडण्यात आले. १८ ऑगस्ट रोजी अबुधाबीहून आलेल्या चौघांना विमानतळावर पकडण्यात आले. त्यांच्याकडून चार किलो ६८७ ग्रॅम सोने पकडण्यात आले. हे सोने अशुद्ध स्वरूपातील होते. त्यानंतर एक कोटी तीन लाखांचे परकीय चलन घेऊन आलेल्या महिलेसह दोघांना पकडण्यात आले. दुबईहून आलेल्या प्रवाशाकडून ४४४ ग्रॅम सोने जून महिन्यात पकडण्यात आले होते. सप्टेंबर २०१७ अखेरीपर्यंत सीमाशुल्क विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईत दोन कोटी वीस लाख रुपयांचे सोने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडण्यात आले. सणासुदीच्या काळात सोन्याच्या तस्करीत वाढ होत असल्याचे निरीक्षण सीमाशुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

देशात सोन्यावर असलेल्या आयातकरामुळे तस्करीच्या घटना वाढल्या आहेत. साधारणपणे वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी सोने तस्करीचे प्रमाण मोठे होते. त्या तुलनेत आता तस्करीचे प्रमाण कमी आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता या विमानतळावर प्रत्येक प्रवाशाची काळजीपूर्वक तपासणी केली जाते. त्यामुळे तस्करी करून भारतात सोने आणणारे शक्यतो छोटय़ा विमानतळांवर उतरतात. मुंबईपासून पुणे जवळ आहे. त्यामुळे आखाती देशातून तस्करी करून आणलेले सोने पुणे विमानतळावर घेऊन प्रवासी येतात. त्या बदल्यात त्यांना अल्प मोबदला दिला जातो. इलेक्ट्रॉनिक्स  वस्तू, कपडे, अंतर्वस्त्रात दडवून सोने आणले जाते. प्रवासी बॅगेत सोने आणण्यासाठी साधारणपणे ३६ टक्के सीमाशुल्क कर आकारण्यात येतो. यापूर्वी आयात करण्यात आलेल्या सोन्यावर दोन टक्के कर होता. आयातकर आता वाढविण्यात आला असून सोन्यावर दहा टक्के आयात कर आकारण्यात येतो. विमानतळावर असलेल्या धातूशोधक यंत्राद्वारे प्रवाशांनी आणलेल्या सामानाची तपासणी करण्यात येते तसेच प्रवाशाच्या पारपत्राची बारकाईने पाहणी करण्यात येते. प्रवाशाच्या देहबोलीवरून सीमाशुल्क विभागाचे अधिकारी कारवाई करतात. पारपत्रावर केलेल्या नोंदीवरून तो आखाती देशात किती वेळा जाऊन आला, याबाबतची माहिती मिळते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सीमाशुल्क विभागाची कारवाई

सन            दाखल गुन्हे            जप्त करण्यात आलेले सोने

२०१६                 १२                   ३ कोटी ९८ लाख

२०१७                 १६                   २ कोटी २० लाख

(सप्टेंबर अखेपर्यंत)

सीमाशुल्क विभागाकडून विमानतळाच्या आवारात विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. विशेषत: आखाती देशातून पुणे विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांवर आमचे लक्ष असते. गोपनीय माहितीच्या आधारे तस्करी करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जाते.

के. शुभेंद्रु, सीमाशुल्क विभाग, सहायक आयुक्त

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold smuggling may rise in pune ahead of diwali festival
First published on: 03-10-2017 at 04:26 IST