पिंपरी : कंपनीचे ग्राहक असलेल्या दुकानदाराकडून ओटीपी क्रमांक घेऊन दुकानदाराच्या नावाने पाठविलेला माल स्वतःकडे ठेवून नऊ लाख ९० हजार २३० रुपयांची फसवणूक केल्याची घटना हिंजवडीत घडली. याप्रकरणी ३९ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे कंपनीत सेल्समन म्हणून काम करत आहेत. त्यांनी आपसांत संगनमत करून कंपनीचे ग्राहक दुकानदारांच्या मोबाइलवर आलेले डिलिव्हरी ओटीपी स्वतःकडे घेतले. दुकानदाराच्या नावाने पाठविलेला माल स्वतःकडे ठेवला. नंतर तो माल बाजारात विकून कंपनीच्या एकूण नऊ लाख ९० हजार २३० रुपयांचा अपहार केला. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
घरफोडी प्रकरणी चोरट्यास अटक
अजमेरा सेक्टरमधील एका गृहनिर्माण सोसायटीतील बंद सदिनेकेचे कुलूप तोडून चोरट्याने सुमारे १६ हजार ९५० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २७ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली आहे. पोलिसांनी चोरट्याचा शोध घेत त्यास अटक केली आहे.
तोसिफ अब्दुल हसिफ चौधरी (वय २२, रा. माऊली फ्लोअर मिल, लालटोपीनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सागर दिलीप दड्डीकर (वय ३२, रा. अजमेरा, पिंपरी) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर हे मूळ गावी दिवाळीसाठी गेले होते. या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातून १६ हजार ९५० रुपयांची त्यामध्ये घड्याळ, चांदीचे ब्रेसलेट, स्पीकर, गॉगल, परफ्युम, मोबाईल, ट्रिमर, मसाजगन असा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी तोसिफ चौधरी याला अटक केली. संत तुकारामनगर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
मोशीत एकाला मारहाण
तू माझ्या मुलाला हात का लावलास, अशी विचारणा करीत एकाला लोखंडी गजाने मारहाण करण्यात आली. ही घटना मोशीत घडली.
याबाबत २६ वर्षीय तरुणाने आयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मोशी येथे कामावर असताना आरोपी तेथे आला. त्याने “तू माझ्या मुलाला तू हात का लावलास?” असे म्हणत फिर्यादी यांना गजाने बेदम मारहाण करून जखमी केले तसेच धमकी दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.
रावेतमध्ये कोयत्यासह तरुणास अटक
पोलीस आयुक्तांच्या बंदी आदेशाचा भंग करून कोयता जवळ ठेवलेल्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
अब्दुल्ल आफताब अन्सारी (वय २०, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, धनगरवाडा मंदिरामागे, काळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रावेत पोलीस ठाण्यातील अंमलदार प्रदीप कामाजी गायकवाड (वय ३५) यांनी याबाबत रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अन्सारी हा किवळे भागात एका ऑटोरिक्षामध्ये बसलेला आढळला. संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून ६०० रुपयांचा लोखंडी कोयता जप्त करण्यात आला. रावेत पोलीस तपास करत आहेत.
