पुणे : ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ सायकल स्पर्धेसाठी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील रस्त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) देण्यात आली आहे. या रस्ते दुरुस्तीसाठी २३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
पुढील वर्षी जानेवारी महिन्यात होणाऱ्या ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ ही आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकल स्पर्धा पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील नऊ तालुक्यात होणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून या स्पर्धेसाठीची तयारी सुरू झाली आहे.
स्वित्झर्लंड येथील युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल (यूसीआय) या आंतरराष्ट्रीय सायकल संघटनेने स्पर्धेला आंतरराष्ट्रीय दर्जा बहाल केला आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱे स्पर्धक ऑलिम्पिक मध्ये भाग घेण्यास पात्र ठरणार आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये सुमारे ६२९ किलोमीटर लांबीची सायकल स्पर्धा होणार आहे.
सायकल स्पर्धेसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसेच जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील रस्ते दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांसाठी सुमारे ५६२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. त्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका त्यांच्या हद्दीतील रस्त्यांसाठी तरतूद करणार आहेत. स्पर्धा चार ते पाच टप्प्यांत ही होणार आहे.
शहरात १२१ किलोमीटर लांबीची स्पर्धा होणार आहे. त्यासाठी सुमारे दीडशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवडमधील ३३ किलोमीटरसाठी ८२ कोटी तसेच पुणे जिल्ह्यातील नऊ तालुक्यांसाठी २३० कोटी रुपये पीएमआरडीएकडून खर्च केले जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी या तालुक्यांमधून हे स्पर्धक जाणार आहेत. तेथील निसर्गाची भुरळ त्या स्पर्धकांना पडावी तसेच त्या मार्गातील सर्व रस्ते चांगल्या दर्जाचे असावेत यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी राज्य सरकारकडून १०० कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. एकूण ५६२ कोटी रुपयांचा निधी यासाठी खर्च करण्यात येणार आहे. त्याबाबतची तरतूद कऱण्यात आली आहे. राज्य सरकारने दिलेल्या निधीच्या माध्यमातून कामांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.