चिन्मय पाटणकर
स्वामी विवेकानंद, गोस्वामी तुलसीदास आणि संत कबीर यांच्यावर आधारित संगीतमय एकल नाटय़ पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. हे एकल नाटय़प्रयोग अनुक्रमे ३१ मे, १ आणि २ जूनला होणार आहेत.
स्वामी विवेकानंद, गोस्वामी तुलसीदास आणि संत कबीर या तिन्ही व्यक्तिमत्त्वांचा काळ वेगवेगळा असला, तरी त्यांच्यात एक साम्य आहे. ते म्हणजे अध्यात्म आणि सामाजिक विचार.. त्यांनी मांडलेले विचार काळापुढचे होते, म्हणूनच ते कालसुसंगत आणि अनुकरणीय ठरतात. लेखक दिग्दर्शक शेखर सेन यांनी या तिन्ही व्यक्तिमत्त्वांना रंगमंचावर साकारण्याची किमया साधली आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही एकल नाटय़प्रयोग संगीतमय आहेत.
सेन यांच्या कबीर या एकल नाटय़ाचा प्रयोग ३१ मे रोजी यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात होणार आहे. प्रेम, शांतता आणि सर्वधर्म समभावाचा संदेश देणाऱ्या संत कबीर यांचे विलक्षण जीवनचरित्र या एकल नाटय़ात मांडले आहे. ६०० वर्षांपूर्वीची ही कथा ४५ गाण्यांसह त्यांनी उलडण्याचा प्रयत्न केला आहे. तर रामचरितमानस या रचनेसाठी तुलसीदास प्रसिद्ध आहे. त्याशिवायही
त्यांनी विनयपत्रिका, हनुमानचालिसा अशा अनेक उत्तमोत्तम रचना केल्या. त्यांचे कार्य, काव्य यांचा वेध तुलसी या एकल नाटय़ातून घेण्यात आला असून, याचा प्रयोग १ जूनला औंधच्या भीमसेन जोशी कलादालन येथे होणार आहे.
उत्तम कौटुंबिक पाश्र्वभूमी असलेले स्वामी विवेकानंद लहान वयातच अध्यात्माकडे वळले. रामकृष्ण परमहंस या गुरूंमुळे त्यांना जीवनदृष्टी लाभली. त्यांचे मौलिक विचार आजच्या काळातही सुसंगत ठरतात. म्हणूनच त्यांचे जीवनचरित्र प्रेरणादायी ठरते. विवेकानंदांची ही प्रेरणादायी कथा रंगमंचावर एकलनाटय़ातून रंगकर्मी शेखर सेन मांडत आहेत. त्यांच्या या नाटय़ाचा प्रयोग २ जूनला बालगंधर्व रंगमंदिरात पाहता येईल.