पुणे : वस्तू व सेवा करातील (जीएसटी) सुधारणांमुळे या प्रणालीतील गुंतागुंत कमी झाली आहे. याचरोबर ग्राहकांसाठी उत्पादने स्वस्त झाल्याने त्यांना फायदा होत आहे. यामुळे त्यांची बचत होत आहे. यातून क्रयशक्तीला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी केले.सीतारामन म्हणाल्या की, सर्व विमा कंपन्यांनी जीएसटी कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचविला आहे.
इनपुट टॅक्स क्रे़डिटचे आव्हान असतानाही कंपन्यांनी हे पाऊल उचलले. यामुळे आयुर्विमा आणि आरोग्य विमा कोट्यवधी नागरिकांना परवडण्यायोग्य बनू लागला आहे. जीवनावश्यक औषधे आणि दैनंदिन वस्तूंवरील जीएसटी कमी झाल्याने त्यांच्या किमती कमी झाल्या आहेत. औषधे, किराणा वस्तू यांच्या किमती प्रामुख्याने कमी झाल्या आहेत. सरकारने केवळ आश्वासन दिले नसून, प्रत्यक्षात नागरिकांना हा परिणाम दिसून येत आहे.
मारुती सुझुकी आणि ह्युंदाईसारख्या मोटार कंपन्यांनी मोटारींच्या विक्रीत विक्रमी वाढ नोंदविली आहे. जीएसटी कपातीचा फायदा कंपन्या आणि व्यापारांकडून ग्राहकांना दिला जात असल्याचे यातून दिसून येत आहे. जीएसटी कपातीचा प्रस्ताव केंद्र सरकारचा होता. जीएसटी परिषदेत सर्वच राज्यांच्या मंत्र्यांनी याला बिनविरोध पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे भारतीय नागरिकांना आता हा फायदा होत आहे, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.