पुणे : कर्ज प्रकरणात जामीनदार असलेल्याला सातत्याने नोटीस बजावत त्याच्याकडून पैसे उकळून त्रास दिल्याने एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांसह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांवर गुन्हा दाखल झाल्याने शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा <<< कृषी उपसंचालकांना मिळणार बढती; ८१ जणांकडून मागविला पसंतीचा विभाग

हेही वाचा <<< पावसामुळे शहरभर वाहतूक कोंडी; प्रमुख चौकातील सिग्नल यंत्रणाही बंद

या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदार भाग्यवान ज्ञानदेव निकम, हवालदार सचिन रामचंद्र बरकडे आणि किरण भातलावंडे (रा. गवळी वस्ती, मांजरी) यांच्या विराोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र उर्फ राजू राऊत (रा. नाना पेठ) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत राऊत यांच्या २३ वर्षीय मुलीने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणीचे वडील राजेंद्र राऊत आणि आरोपी किरण मित्र आहेत किरण यांनी त्याच्या चारचाकी गाडीवर कर्ज घेतले होते. कर्ज प्रकरणात राऊत यांना जामीनदार केले होते. किरण यांनी कर्जाचे हप्ते भरले नाहीत. त्यामुळे न्यायालयााने जामीनदार असलेल्या राऊत यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर नोटीस घेऊन समर्थ पोलीस ठाण्यातील निकम आणि बरकडे राऊत यांच्याकडे आले.

हेही वाचा <<< सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांमुळेच शहर पाण्यात

अटक करण्याची भीती दाखवून राऊत यांच्याकडून निकम, बरकडे यांनी वेळोवेळी ७ ते ८ हजार रुपये उकळले. राऊत यांनी किरणला गाडीचे हप्ते भरण्याचे सांगितले. मात्र, किरणने हप्ते भरले नाही. त्याने राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे राऊत यांनी सोमवारी (१२ सप्टेंबर) पहाटे नाना पेठेतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघा पोलिसांसह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करत आहेत.