पुणे : गुलटेकडी आणि लोणी काळभोर भागात चाेरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज लांबविल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध स्वारगेट आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुलटेकडीतील क्रिसेंट हायस्कूलजवळ श्रीकृष्ण अपार्टमेंटमधील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख २२ हजार ५०० रुपयांचे साेन्याचे दागिने लांबविले. याबाबत एकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदारांची सदनिका बंद होती. चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील दागिने लांबविले. पोलीस उपनिरीक्षक बी.पी. शिरसाट तपास करत आहेत.
लोणी काळभोरमधील कदमवाक वस्ती येथील प्रथमेश अपार्टमेंटमधील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ३० हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एक लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत एकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे तपास करत आहेत.
वानवडीत दवाखान्यात चोरी
वानवडीतील फातिमानगर येथील एका दवाखान्याचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी आठ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. याबाबत एका डाॅक्टरांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार डाॅक्टर लष्कर भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. फातिमानगर भागातील हिमालया बिल्डींगमध्ये तळमजल्यावर त्यांचा खासगी दवाखाना आहे. चोरट्यांनी दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. डाॅक्टरांच्या केबीनची काच फोडली. कप्प्यातील रोकड लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस हवालदार रजपूत तपास करत आहेत.