पिंपरी : हॉटेलमध्ये जेवण केलेल्या जेवणाचे आणि मद्यपानाची उधारी मागितल्याने दोघांनी हॉटेल मालकाला शिवीगाळ केली आणि पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना पिंपरी येथे घडली. या प्रकरणी हॉटेल व्यावसायिकाने संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सनी अशोक परदेशी (३२, पिंपरी) आणि रोहित बोथ (२५, पिंपरी) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पिंपरीतील फिर्यादीच्या हॉटेलमध्ये जेवण आणि मद्यपान केल्यानंतर एक हजार ९४३ रुपयांचे बिल देण्यास नकार दिला. फिर्यादीने बिल मागितल्यानंतर त्यांना शिवीगाळ करून, ‘तुला गोळ्या घालतो, तू मला ओळखत नाहीस काय’ असे म्हणून धमकावले. आरोपी सनीने कमरेला लावलेले पिस्तूल बाहेर काढून फिर्यादीला जिवे मारण्याची भीती दाखवली. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.
वाकडमध्ये मॅफेड्रॉन विक्री प्रकरणी दोघांना अटक
अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांकडून लाखो रुपयांचे ‘एमडी’ (मॅफेड्रॉन) पावडर जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई वाकड येथे करण्यात आली.बालाजी भारत चकृपे (३७, दिघी) आणि समाधान गणेश गंगणे (१९, दिघी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कावेरीनगर भाजी मंडईजवळ मॅफेड्रॉन विक्रीसाठी दोघेजण येणार असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बालाजीकडून २ लाख ८४ हजार रुपये किमतीचे ५६.८० ग्रॅम एमडी पावडर आणि आरोपी समाधानकडून ५९ हजार २०० रुपये किमतीचे ११.८४ ग्रॅम एमडी पावडर जप्त केले. दोघांकडून एकूण ३ लाख ४३ हजार २०० रुपये किमतीचे ६८.६४ ग्रॅम एमडी पावडर अमली पदार्थ बेकायदेशीरपणे विक्रीसाठी ताब्यात ठेवलेले आढळले. वाकड पोलीस तपास करत आहेत.
म्हाळुंगेत गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश, ८८ सिलेंडर जप्त
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आले आहे. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने निघोजे येथे करण्यात आली.
आकाश विजय गोसावी (२०, चाकण) आणि तीर्थराज विठ्ठल गिरी (३४, अंबी जळगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस शिपाई गोविंद डोके यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडे गॅस रिफिलिंगसाठी कोणताही परवाना नव्हता. लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल हे माहीत असतानाही, ते ज्वालाग्राही पदार्थांबाबत पुरेशी खबरदारी न घेता घरगुती सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये गॅस काढत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण ११ लाख ६ हजार ११० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यात ८७ घरगुती आणि एक लहान असे एकूण ८८ गॅस सिलिंडर, एक वजन काटा, गॅस रिफिल करण्याचे साहित्य आणि एक चारचाकी वाहन यांचा समावेश आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
चिंचवडमध्ये चाकूच्या धाकाने खंडणी
चाकूचा धाक दाखवून दोन व्यक्तींनी एका तरुणाकडून रोख रक्कम, ऑनलाइन पैसे आणि मद्याची मागणी करून खंडणी उकळली. ही घटना चिंचवड येथे घडली.
या प्रकरणी तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पायी चालत जात असताना दोन व्यक्तींनी त्यांना चाकू दाखवून ‘ठार मारण्याची’ धमकी दिली. आरोपींनी फिर्यादीला त्यांच्या बँक खात्यातील सर्व पैसे आणि मद्य देण्याची मागणी केली. या धमक्यांमुळे घाबरून फिर्यादीने त्यांना १० हजार रुपये रोख, १० हजार रुपये ऑनलाइन आणि ५२५ रुपयांचे मद्य दिले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीची विक्री
बनावट आधार, पॅन कार्ड तयार करून आणि खोटे नाव वापरून एका महिलेची जमीन बेकायदेशीरपणे दुसऱ्या व्यक्तीला विकून फसवणूक केल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली.
या बाबत महिलेने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीच्या खोट्या नावाने आणि तिच्या भावाच्या खोट्या नावाने बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड तयार केले. ही बनावट कागदपत्रे तलाठी कार्यालयात सादर करून वारस नोंदणी केली. त्यानंतर त्या जमीनीची विक्री करुन फिर्यादीची फसवणूक केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करित आहेत.
बावधनमध्ये जमिनीच्या वादातून भावांमध्ये मारहाण
वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून एका भावाने आपल्या मोठ्या भावाला मारहाण केल्याची घटना आल्हाटवस्ती, लवळे येथे घडली. याबाबत मोठ्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार लहान भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी मोजणी झाल्यानंतर फिर्यादीने त्यांच्या लहान भावाला, ‘आता माझी जमीन मला दे’ असे म्हटले. यावर आरोपीने फिर्यादीला ‘तुला जमीन देत नाही, काय करायचे ते कर’ अशी धमकी दिली आणि शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने हाताने मानेवर चापट मारली आणि गजाने फिर्यादीच्या डाव्या मांडीवर मारून त्यांना जखमी केले. बावधन पोलीस तपास करत आहेत.